दीपक मोहिते,
जिल्हा परिषद / पंचायत समिती निवडणूक २०२५,-
रणसंग्राम,पालघर तालुका,
जिल्हा परिषद निवडणूक ; भाजप,सेनेचा पालघरचा गड भेदणार…
पालघर जिल्हा परिषदेच्या एकूण ५७ जागांपैकी पालघर – १७,डहाणू – १३ या दोन तालुक्यात एकूण ३० जागा आहेत.या दोन्ही तालुक्यातील जागांवर जो राजकीय पक्ष विजयी होतो,तो जिल्ह्यावर आपली हुकूमत चालवतो. कारण या दोन्ही तालुक्यात एकूण जागापैकी ५१ % जागा आहेत.त्यामध्ये पालघर तालुक्यात सर्वाधिक १७ गट आहेत.पालघर तालुका हा काही किरकोळ अपवाद वगळता कायम शिवसेनेच्या पाठीशी उभा राहिला.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्षात फूट पडल्यानंतर या तालुक्यातील ८० % पदाधिकारी व शिवसैनिक शिंदे गटात सामील झाले व हा गट सत्तेत आला.त्यांच्या गटाचे प्रकाश निकम जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले.मात्र या निकम यांनी विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करत विक्रमगड विधानसभा निवडणूक लढवली.या निवडणुकीत ते भाजपच्या उमेदवाराकडून पराभूत झाले.मात्र त्यांनी निवडणुकीनंतर आपल्या समर्थकांसह भाजपचा तंबू गाठला व महायुतीमध्ये काहीशी चलबिचल निर्माण झाली.तत्पूर्वी एकनाथ शिंदे यांनी,भाजप ज्यांना सतत पाण्यात बघत आली,त्या निलेश सांबरे यांना पक्षात प्रवेश दिला होता,त्या बदल्यात भाजपने प्रकाश निकम यांना आपल्या गळाला लावले.त्यानंतरही राजकीय सुडाचा प्रवास काही थांबला नाही.जिल्हा परिषदेवर भाजपचे वर्चस्व निर्माण व्हावे,यासाठी सध्या विविध हातखंडे वापरण्यात येत आहेत.
या तालुक्यात असलेल्या १७ गटापैकी ३७ तारापूर,३८ दांडी,३९ नवापूर,४० बोईसर,४१ बोईसर ( वंजारपाडा ),४२ सरावली,४३ खैरपाडा,४४ शिगाव,४५ बऱ्हाणपूर,४६ मनोर,४७ हालोली,४८ धुकटन,४९ सातपाटी,५० माहीम,५१ केळवा,५२ एडवण व ५३ उंबरपाडा/ नांदाडे या गटाचा समावेश आहे.तसेच या गटातर्गत पंचायत समितीचे ३४ गण येतात.
या पालघर व डहाणू तालुक्यात ज्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळतात,तो पक्ष सत्तेत येत असतो. शिवसेना ( शिंदे गट ) व भाजप या निवडणुकीत वेगवेगळे लढले तरी ते निवडणुकीनंतर एकत्र येऊ शकतात.त्यामुळे ही जिल्हा परिषद महायुतीकडेच जाण्याची शक्यता अधिक आहे.मात्र भाजपकडे पुरेसे सक्षम उमेदवार नसल्यामुळे भाजप ऐन निवडणुकीच्या तोंडावर फोडाफोडीच्या राजकारणाची वात पेटवेल, शक्यता आहे.पालघर जिल्ह्याची निर्मिती होऊन एक दशक उलटून गेल्यानंतरही अद्याप विकासाला गती मिळू शकलेली नाही.पालघर तालुक्याच्या ग्रामीण भागात आजही विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.त्यामध्ये मासेमारी,कृषी,पर्यटन,नागरी सुविधा व आदिवासी समाजाचे प्रश्न ” जैसे थे,” स्थितीतच आहेत.हा तालुका एकेकाळी शिवसेनेचा गड होता,तो भेदण्यासाठी भाजप या निवडणुकीत जंग जंग पछाडेल,याविषयी तिळमात्र शंका नाही.

