वसंत भोईर,वाडा
चिंचघर – वाडा येथे इनोव्हेटर्स फसाड कंपनीचे बेसुमार अनधिकृत बांधकाम,
वाडा तालुक्यातील चिंचघर गावातील मे.इनोव्हेटर्स फसाड कंपनीने नियम धाब्यावर बसवून हजारो चौरस मीटरचे अनधिकृत बांधकाम केले आहे.या अनधिकृत बांधकामाला ग्रामपंचायतीने कंपनीला नोटिस बजावली आहे.मात्र कंपनीने या नोटीसीला केराची टोपली दाखवली असून, ग्रामपंचायतीचा लाखो रुपयांचा कर थकवला आहे.कंपनीच्या या अनधिकृत बांधकामावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायतीने जिल्हाधिकारी पालघर यांच्याकडे केली आहे.
तालुक्यातील चिंचघर ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात इनोव्हेटर्स फसाड ही इमारत बांधकाम साहित्य बनवणारी कंपनी कार्यरत आहे.कंपनीने आपल्या मालकीच्या भूखंड क्रमांक ४२९, ४०४/२ब ४०३/१ या जमिनीवर बांधकाम करताना जमीन महसूल संहिता कायदे, नगररचना कायदे, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम यांचे उल्लंघन केले आहे.कंपनीच्या मालकीच्या १५ हजार ७४६ चौरस मीटर जागेवर ४ हजार १२८ चौरस मीटर प्रस्तावित बांधकामाची सनद तहसीलदार वाडा यांच्याकडून घेतली आहे.परंतु कंपनीने आपल्या मालकीच्या जागेत सुमारे १८ हजार चौरस मीटरचे बांधकाम केले असून यांपैकी सुमारे १४ हजार चौ. मी.बांधकाम हे वाढीव असून, हे बांधकाम करताना महसूल खात्याचा बिगरशेती परवाना, बांधकाम आराखड्याला नगररचना कार्यालयाची मंजुरी,तसेच स्थानिक ग्रामपंचायतची परवानगी घेतलेली नाही.
या वाढीव बांधकामाबाबत चिंचघर ग्रामपंचायतने कंपनी प्रशासनाला वारंवार लेखी सूचना देऊनही बांधकामाशी निगडित कोणत्याही परवानग्या कंपनीने सादर केल्या नाहीत.त्यामुळे ग्रामपंचायतीने हे वाढीव बांधकाम अनधिकृत घोषित करून सुमारे ३१ लाख ४२ हजार रु.ची कर आकारणी बिल,मागणीचा हुकूमनामा व जप्तीचे बिल बजावले आहे.परंतु कंपनीने यापैकी एकही रु.चा कर भरणा ग्रामपंचायतला केला नाही.
याबाबत बोलताना चिंचघर ग्रामपंचायतचे उपसरपंच मनेश पाटील यांनी सांगितले की,कंपनी प्रशासनाच्या या मुजोरपणाबद्दल ग्रामपंचायतने गेल्या वर्षी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना कळवले होते,परंतु त्यांच्याकडून कोणतीही कारवाई न झाल्यामुळे ग्रामपंचायतीने आता जिल्हाधिकारी पालघर व नगररचना कार्यालय पालघर यांच्याकडे तक्रार करून कंपनीच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
यासंदर्भात कंपनीचे व्यवस्थापक अजित झा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
कोट
मंडळ अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात येईल.
भाऊसाहेब अंधारे,
तहसीलदार,वाडा,

