दीपक मोहिते,
समुद्रधन वाचवणे, ही काळाची गरज,
दरवर्षी पावसाळ्यात सलग दोन महिने खोल समुद्रातील मासेमारी बंद ठेवण्यात येत असते.यंदाही १ जूनपासून ही बंदी लागू झाली असून ती सुमारे दोन महिने बंद राहणार आहे.हा काळ माश्याचा प्रजननाचा असल्यामुळे सरकार ही बंदी लादत असते.या काळात झालेली मासेमारी आपल्या व्यवसायावर गंडांतर आणते,हे लक्षात आल्यानंतर राज्यातील तमाम मच्छिमार संघटनांनी सरकारच्या या निर्णयाला सर्वानुमते मंजुरी दिली.त्यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून ही बंदी अंमलात येत आहे.या काळात मच्छिमार बोटी समुद्रकिनारी निवांत विश्रांती घेत असतात.प्रजनन काळात होणाऱ्या मासेमारीमध्ये माश्यांच्या छोट्या पिल्लांची कत्तल होत असते तसेच माश्याच्या अंड्याचाही नाश होत असतो व त्याचा परिणाम मत्स्य उत्पादन वाढीवर जाणवतो. गेल्या काही वर्षात समुद्रधन उतरणीला लागले आहे.त्यामागे निसर्ग व मानवनिर्मित कारणे आहेत. समुद्रातील धनाचा नाश रोखण्यासाठी सरकार अशाप्रकारची सक्तीची बंदी लादत असते.
सलग दहा महिने काबाडकष्ट करणारा,नैसर्गिक संकटांना सामोरा जाणारा व मानवनिर्मित संकटे अंगावर झेलणारा हा मच्छिमार या काळात निवांत जीवन जगत असतो.एरवी समुद्राच्या लाटांवर हेलकावे खात निसर्गाशी दोन हात करणारा मच्छिमार आपल्या कुटुंबासोबत शांतपणे जीवन जगत असतो.या दोन महिन्यांच्या काळात देवदर्शन,पर्यटनस्थळांना भेटी देणे,मासेमारी बोटींची डागडुजी/दुरुस्ती व इतर साहित्याची जमवाजमव,असा त्याचा दिनक्रम असतो.कुटुंबासमवेत मिळणारा निवांतपणा हा फक्त याच काळात उपलब्ध होत असतो व त्याचा पुरेपर आनंद तो व त्याचे कुटुंबीय आवर्जून घेत असतात.
आपल्या देशात समुद्री क्षेत्र प्रचंड असले तरी समुद्रातील माश्याचा साठा मर्यादीत आहे.माशांची उपलब्धता दूरवर पसरलेल्या समुद्रापेक्षा किनारी भागात,मुख्यतः सुमारे ४० वाव खोलीपर्यंतच्या भागातच अधिक असते.
या मर्यादित क्षेत्रात ( राज्यात सुमारे ४३ हजार चौरस कि.मी. ) सगळ्या नौका मासेमारी करू लागल्या,की आपोआपच संघर्ष निर्माण होतो.मर्यादित जलसंपत्ती मासेमारीद्वारे मिळवणे,हाच एकमेव मार्ग असल्यामुळे यावर काही निर्बंध आणणे आवश्यक आहे.अन्यथा उत्पादन टिकवून धरणे शक्य नाही.
मच्छीमार नौकांची संख्या बेसुमार वाढूनही मत्स्योत्पादन स्थिर राहिले तर दर नौकेचे सरासरी उत्पादन कमी होण्याची आणि मिळणाऱ्या माश्याचा सरासरी आकार कमी होण्याची भिती असते. आज तशीच परिस्थिती सध्या पाहायला मिळत आहे. मासेमारीसाठी वापरल्या जाणाऱ्या जाळ्याचा आस कमी होत गेला तर लहान आकाराची मासळी पकडली जाऊन,ती प्रथम प्रजननापूर्वीच पकडली जाण्याची भिती असते.त्यामुळे मच्छीमार नौकांची संख्या, आसांचा आकार, मासेमारीसाठी वापरावयाचे क्षेत्र,यावर काही निर्बंध घालून मासेमारीचा व्यवसाय कालांतराने धोक्यात येण्यापासून वाचवण्याची गरज आहे.त्यासाठी सागरी मासेमारी अधिनियमानुसार भारताच्या जलक्षेत्रात मासेमारी नौकांना पावसाळी मासेमारीसाठी बंदी घातली जाते.एकसष्ट दिवसांचा हा कालावधी राज्याच्या पूर्व किनारपट्टीसाठी १५ एप्रिल ते १४ जून,तर पश्चिम किनारपट्टीसाठी १ जून ते ३१ जुलै,असा ठरवण्यात आला आहे.
मासेमारी करणाऱ्या नौकांसाठी मोठ्या प्रमाणावर भांडवली गुंतवणूक होते. त्यामुळे या नौकांचा वापर काळजीपूर्वक करावा लागतो. प्रतिकूल हवामानात ( उदा.जोराने वारे वाहणे,समुद्र खवळणे,चक्रीवादळ ) नौका समुद्रामध्ये नेल्यास त्या नामशेष होण्याचा धोका अधिक असतो.त्यामुळे देश,पर्यावरण तसेच वैयक्तिक हानी होत असते.नौकांना पावसाळ्यात मासेमारी करण्यापासून बंदी घालून त्यांना काही प्रमाणात संरक्षण मिळण्यासाठी मासेमारी बंदीचा मार्ग हा शहाणपणाचा आहे.
जे मच्छीमार फक्त मासेमारी करून आपला उदरनिर्वाह करतात,त्यांच्या उत्पन्नावर पावसाळ्यातील मासेमारी बंदीचा परिणाम होतो.बऱ्याच मच्छीमारांकडे मासेमारीसाठी खास तयार केलेली कौशल्ये असतात आणि ते इतर प्रकारच्या कामात पारंगत नसतात.परिणामी,त्यांना या बंदीच्या काळात मासेमारी उद्योगा व्यतिरिक्त पर्यायी रोजगाराच्या संधी शोधाव्या लागतात.
पावसाळ्यापूर्वी मिळालेल्या मासळीपासून चटणी,लोणची किंवा सुक्या मासळीपासून मूल्यवर्धित पदार्थ तयार करता येतात.या योजना पावसाळ्यातील मासेमारी बंदी कालावधीत रोजगार निर्माण करून अर्थार्जनालाही हातभार लावू शकतात.कायद्याने पावसाळ्यात मासेमारी बंदीसारखे निर्बंध अलीकडे घालण्यात आले आहेत.
पावसाळ्यात मासेमारीसाठी न जाण्याची आणि नारळीपौर्णिमेला समुद्रपूजन करून मासेमारीला सुरुवात करण्याची मच्छीमारांची परंपरा आहे.या प्रथेला अनुसरून हा निर्बंध आहे.या निर्बंधाचे पालन मच्छीमार जितक्या काटेकोरपणे करतील,तितकीच त्या निर्बंधाच्या उद्दिष्टपूर्तीस मदत होऊन शाश्वत मासेमारी,ही संकल्पना रुजण्यासाठी हातभार लागेल.
माशांच्या प्रजननासाठी समुद्राच्या पाण्याचे तापमान, पोषक द्रव्य,पाण्याची क्षारता व घनता इ.महत्त्वाच्या बाबी आहेत.
पर्ससीन पद्धतीची मासेमारी थव्याने राहणारे पृष्ठभागाजवळ मासे पकडण्यासाठी होत असते.अशा काळात जर प्रजननयोग्य मासे किंवा माशांची पिले पकडली गेली,तर पावसाळ्यानंतर होणाऱ्या मासेमारीवर त्याचा विपरीत परिणाम होत असतो.
सरकार आपल्यापरीने या व्यवसायाला सुगीचे दिवस यावेत,यासाठी प्रयत्नशील आहे.सरकारने या व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारचा हा निर्णय स्तुत्य असाच आहे.पण मच्छिमारांनी देखील समुद्रातील धन कमी होता कामा नये,यासाठी सहकार्य करण्याची तयारी दाखवायला हवी.बंदीच्या काळात सरकारी आदेश धुडकावून छुप्या पद्धतीने मासेमारी करणाऱ्यांना रोखले पाहिजे.

