दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
राजकीय फायद्यासाठी जन्मदात्या बापाला बदलता येते का ?
राजकारण व प्रेमात सारं काही क्षम्य असतं,असं म्हंटल जाते.ते एकप्रकारे खरंच आहे. पण राजकीय फायद्यासाठी आपला बापच बदलला जातो, याचा अनुभव महाराष्ट्राच्या जनतेला प्रथमच आला आहे.आपल्या हिंदू धर्मात आपले आईवडील हे दैवत मानले जाते.आता त्यापैकी वडिलांना बदलण्याची प्रक्रिया काही तथाकथित हिंदुत्ववादी नेत्याने सुरू केल्यामुळे आता सवाल – जबाबचा सिलसिला सुरू झाला आहे.शहर विकासासाठी देण्यात येणाऱ्या निधीला स्थगिती देण्यात आल्यामुळे आधुनिक काळातील या थोर पुत्राने आपला बापच बदलून टाकला.त्यामुळे उद्दिग्न झालेल्या त्याच्या ओरिजिनल बापाने आणि थोरल्या भावाने आपल्या धाकल्या भावाचे कान चांगलेच उपटले आहेत.पण आपल्या नेत्याला बाप बनवण्याच्या धुंदीत हा वाया गेलेला पोर ऐकेल,असे वाटत नाही.मंत्रिपद मिळाल्यापासून हे पोर इतकं चेकाळले आहे की,मंत्रिपद मिळाल्या,मिळाल्या त्याने ” आपला बाप सागर बंगल्यावर बसल्याची आरोळी ठोकली.त्यामुळे हिंदू समाज निशब्द झाला.त्यानंतर एका विशिष्ट समाजाला धमकी देत ” घरात घुसून मारू,” अशी राणा भीमदेवी थाटात गर्जना केली.त्यानंतर या महाशयाने हिंदू लोकांनी ” मुस्लिम खाटकाकडून मटण खरेदी करू नका,” असा फतवा जारी केला.पण हिंदू लोकांनी या त्यांच्या फतव्याला केराची टोपली दाखवली.हे सारे रामायण घडत असताना यांचे दोन बाप व थोरला भाऊ त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होते.पण त्यांनी आपला बाप काय करू शकतो,याविषयी रसभरीत वर्णन करण्यास सुरुवात केली.त्यानंतर हे तिघेजण खडबडून जागे झाले.पण तोवर वेळ निघून गेली होती. समाजमाध्यमावर सर्वत्र धुमाकूळ सुरू झाला होता. तसेच घटक पक्षाच्या मंत्र्यांनी देखील त्यांच्या नवीन बापाची कहाणी ऐकून या तथाकथित हिंदुत्ववादी नेत्यांची चांगलीच खरडपट्टी काढली.आपल्या नेतृत्वाखाली असलेल्या मंत्रिमंडळातील सहकारी मंत्र्यांचा संताप पाहून नव्या बापाने लगबगीने या बिघडलेल्या या पोराचे कान चांगलेच उपटले.दुसरीकडे ज्या ओरिजिनल बापाने या दिवट्या पोराला जन्माला घातले,त्या बापाने त्याला खडे बोल सुनावले.पण त्याचा उपयोग होईल,असे वाटत नाही.कारण या ओरिजिनल बापानेही मनसेच्या एका वयोवृद्ध नेत्याला त्याचवेळी ठोकून काढण्याची वल्गना केल्यामुळे ” बाप तैसा बेटा,” या हिंदी म्हणीवर एकप्रकारे शिक्कामोर्तब झाले.पण हा धाकला पोर मात्र सध्या शांत झाल्याचे पहायला मिळत आहे.बेताल वक्तव्ये करण्याऐवजी या कुटुंबाने आता भाजपच्या पठडीत तयार होण्यासाठी शाखेत हजेरी लावण्याची गरज आहे.

