दीपक मोहिते,
एकनाथ शिंदे व अजित पवार गटाच्या आमदारांवर सध्या स्वाभिमान गुंडाळून ठेवण्याची पाळी आली आहे,
महायुती सरकारमध्ये शिवसेना ( शिंदे गट ) व राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट ) या दोघांना भाजपकडून मिळणारी वागणूक लक्षात घेता या दोन्ही गटाच्या आमदारांना आपला स्वाभिमान गुंडाळून ठेवावा लागत आहे.तशीच परिस्थिती निर्माण झाली तर अजित पवार हे पुन्हा शरद पवाराकडे वळू शकतात.पण एकनाथ शिंदे काय किंवा त्यांच्या आमदारांना पुन्हा उद्धव गटात एंट्री मिळणे कदापि शक्य नाही.कारण ” गद्दारांना क्षमा नाही,” या बाळासाहेबाच्या धोरणानुसार उद्धव ठाकरे यांनी वागायचे ठरवल्यामुळे शिंदे गटाच्या आमदाराना उबाठाची दारे आता बंद झाली आहेत.
गेल्या वर्षी मोदी सरकारने सत्तेत आल्या,आल्या एकनाथ शिंदे व अजित पवार गटाला त्यांची औकात दाखवून दिली होती.केंद्रीय मंत्रिमंडळात शिंदे गटाला केवळ एक राज्यमंत्री ( स्वतंत्र भार ) पद देण्यात आले,तर अजित पवार यांची पाटी कोरीच राहीली.केंद्रीय मंत्रिमंडळाची जडणघडण लक्षात घेता,भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये महाराष्ट्रद्वेष किती नसानसात भरला आहे,ते त्यावेळी पाहायला मिळाले.अत्यंत दुःखदायक असे हे चित्र असून या दोन्ही गटाच्या आमदारांनी आता माघारी फिरावं,अशी उभ्या महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आहे.पण आता ते शक्य नाही.
लोकजनशक्ती पक्षाचे चिराग पासवान व अपना दलाच्या अनुप्रिया पटेल या दोघांना अनुक्रमे कॅबिनेट व राज्यमंत्रीपद मिळू शकते,तर सात जागा जिंकणाऱ्या शिंदे गटाची केवळ एका राज्यमंत्रीपदावर बोळवण केली जाते.हा महाराष्ट्रद्वेष नाहीतर काय आहे ? अजित पवार यांना त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या रचनेच्या वेळी उंबरठ्यावर पण उभे राहू दिले नाही.या दोघांना त्यावेळी भाजपने चांगलीच अद्दल घडवली.त्यावेळी या सर्व घडामोडीवर भाष्य करताना खा.श्रीरंग बारणे यांनी आपला उद्वेग बोलून दाखवला होता.ते म्हणाले,अजित पवार यांनी भाजपला साथ देण्यासाठी आपल्या घरातील लोकांशी वाईटपणा घेतला,निदान त्यांना तरी भाजपने न्याय द्यायला हवा होता.मोदी यांच्या नूतन मंत्रिमंडळात गुजरात,मध्यप्रदेश,
बिहार राजस्थानसह उत्तर प्रदेशातील नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.या निवडणुकीत शिंदे व अजित पवार गटाच्या ताकदीचा अंदाज भाजपला आला असून त्यांनी या दोघांना त्यांच्या जागा दाखवून दिल्या आहेत.या सर्व परिस्थितीममुळे दोन्ही
गटाच्या आमदारामध्ये नैराश्य आले आहे.त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिण योजनेने महायुतीला तारले. अपेक्षेप्रमाणे भाजप हा महायुतीमध्ये मोठा पक्ष ठरला व त्यांच्या दादागिरीला तेंव्हापासून वेग आला.मंत्रीपदे, खातेवाटप,पालकमंत्रीपदे व आता निधीवाटप यावरून झालेली खडाजंगी लक्षात घेता भविष्यात या दोन्ही पक्षाची चांगलीच गळचेपी होत राहणार आहे,असे संकेत मिळत आहेत.हल्ली उपमुख्यमंत्री वृत्तवाहीनीच्या छोट्या पडद्यावरून गायब झाले आहेत.मुख्यमंत्रीपद हिरावले गेल्यानंतर ते दर पंधरा दिवसांनी सातारा जिल्ह्यातील दरे या आपल्या आपल्या मूळ गावातील शेतीत रमू लागले आहेत.त्यांच्या गटांचे आमदार त्यांच्याकडे सतत आपले रडगाणं गात असतात.पण त्या आमदारांची अवस्था ” अप्लाय,अप्लाय,बट नो रिप्लाय,” अशी झाली आहे. लाडक्या बहिणींनी या लोकांना सत्तेत बसवलं खरं, त्यांचे हात जखडून ठेवले. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांचे रडणं पाहून फडणवीस यांच्या हृदयाला पाझर फुटेल,असे वाटले होते. पण फडणवीस व शिंदे यांनी मौन बाळगले.त्यानंतर अर्थविभागावर आदळापट करणारे संजय शिरसाठही कोमात गेले.शिंदे गटातील अनेक आमदारांना आता पश्चाताप होत आहे.त्यापैकी अनेक जण घरवापसीच्या मानसिकतेत असल्याचे समजते,पण जाणार कुठे ? अडीच वर्षांपूर्वी आपण जे काही केले,ते महाराष्ट्राच्या जनतेच्या पचनी पडले नाही. त्याचे परिणाम लोकसभा निवडणुकीत आपल्याला भोगावे लागले.त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणीमुळे आपण पुन्हा सत्तेत येवू शकलो.पण आता सावत्र भावांकडून मिळणाऱ्या वागणुकीमुळे ” तोंड बांधून बुक्क्याचा मार सहन करण्याची पाळी,” त्यांच्यावर आली आहे.दुसरीकडे या गद्दारांना पुन्हा पक्षात प्रवेश देऊ नये,असा मतप्रवाह शरद पवार व उद्धव ठाकरे गटात पाहायला मिळत आहे.आपला
स्वाभिमान गुंडाळून भाजपच्या नादी लागणाऱ्या शिंदे व अजित पवार गटांला पुन्हा थारा देता कामा नये,असे या दोन्ही पक्षातील जुन्याजाणत्या ज्येष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे.त्यामुळे या आमदारांची अवस्था ” इकडे आड,तिकडे विहीर,” अशी झाली आहे.

