वसंत भोईर,वाडा
घराचे अनधिकृत बांधकाम बंद केल्याच्या रागातून उपसरपंचास धमकी,
-
तालुक्यातील सोनाळे ग्रामपंचायत हद्दीतील घराचे अनधिकृत बांधकाम नोटीस देऊन बंद केल्याच्या रागातून सोनाळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच सचिन तिखंडे यांना मोबाईलवरून धमकी देण्यात आली आहे.याप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना काल दुपारच्या सुमारास घडली होती.
अमोल गोरे व कल्पेश कोर अशी धमकी देणाऱ्या आरोपींची नावे आहेत.मिळालेल्या माहितीनुसार,यातील आरोपीनी सोनाळे ग्रामपंचायत हद्दीत अजय कुमार चोखणी यांच्या घरांचे बांधकाम काम सुरू केले होते.सदरचे काम अनधिकृत असल्यामुळे ग्रामपंचायतीने ते नोटीस देऊन बंद केले होते.याचा राग मनात धरून आरोपींनी उपसरपंच सचिन यांना दूरध्वनीवरून ” तु,आमचे साईटवरचे काम का बंद केले ? तुमचा त्या कामाशी काहीही संबंध येत नाही.तु उद्या जागेवर ये,मग तुला बघून घेतो,अशी धमकी दिली.
याप्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस नाईक जी.एल.मोंढे करत आहेत.
दरम्यान या धमकीचा उपसरपंच संघटनेने निषेध केला असून आरोपींवर कडक कारवाई करण्याचे मागणी केली आहे.

