संजय लांडगे,वाडा
धानाची बोनस रक्कम शेतकऱ्यांना तातडीने देण्यात यावी,
आदिवासी विकास महामंडळाकडून खरेदी केलेल्या धानाची ( भात ) बोनस रक्कम तातडीने संबंधित शेतकऱ्यांना मिळावी, यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यांनी वाड्याचे तहसीलदार यांच्याकडे मागणी केली आहे.
आदिवासी विकास महामंडळाकडे वाडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी भातविक्री कामी नोंदणी केली आहे.नोंदणी केलेल्या प्रत्येक शेतकऱ्यास बोनस देण्याचे शासनाचे धोरण आहे,असे असतांना वाडा तालुक्यातील शेतकऱ्यांना आजतागायत बोनसची रक्कम अदा करण्यात आलेली नाही.
सध्या शेतीचा हंगाम सुरू असून,पेरणीची कामे सुरू झाली आहेत.मात्र शेतकऱ्यांकडे शेतीच्या या हंगामासाठी पुरेसे पैसे नसल्याने त्यांना पेरणी करणे शक्य होत नाही.त्यामुळे भातशेती लागवडीखाली येणार नाही व मजूरांच्या हाताला काम देखील मिळणार नाही.त्यामुळे संबंधित मंडळाकडे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना तातडीने भात विक्रीपोटीची बोनस रक्कम देण्यात यावी,अशा मागणीचे निवेदन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांनी वाड्याचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांना दिले.याप्रसंगी त्यांच्यासोबत तालुका अध्यक्ष दिलीप पाटील,वैभव पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.

