सुरेश वैद्य,पालघर,
” नाविन्यपूर्ण उपक्रम,”
पालघर जिल्ह्यात ५० लाख बांबू वृक्षलागवडीचा शुभारंभ,
बांबू लागवडीसाठी पालघर जिल्हा हा उपयुक्त असा जिल्हा आहे.येथे नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या लागवडीतून जिल्ह्यातून होणारे स्थलांतर देखील रोखता येणे शक्य आहे.बांबूचे उत्पन्न,आपण महिला बचत गटाच्या माध्यमातून मार्केट लीकेज आणि प्रक्रिया उद्योगाला जोडण्याचे पुढील तीन ते पाच वर्षात प्रयत्न करणार आहोत.शेतकऱ्यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचा लाभ घेऊन बांबू लागवडीतून आपले जीवन बदलावे,असे प्रतिपादन राज्य कृषी मूल्य आयोग व कार्यकारी मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास टास्क फोर्सचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी आज धानिवरी ता.डहाणू येथे केले.
जगभरात जागतिक पर्यावरण दिन साजरा होत असताना महाराष्ट्राच्या दुर्गम पालघर जिल्ह्यातील धानिवरी ता.डहाणू या आदिवासी पाड्यावर अभिनव ५० लाख बांबू वृक्ष लागवडीचा संकल्प प्रत्यक्ष बांबू लागवड शुभारंभ करून झाला.त्यावेळी पाशा बोलत होते.
या कार्यक्रमास राज्याचे पणन सहकार व वस्त्र उद्योग सचिव प्रवीण दराडे,जिल्हाधिकारी डॉ.इंदूराणी जाखड़, उपविभागीय अधिकारी विशाल खत्री,वनसंरक्षक निरंजन दिवाकर, उपजिल्हाधिकारी ( मनरेगा ) विजया जाधव,धानिवरीचे सरपंच शैलेश कोडा, उद्योगपती दिनेश शर्मा आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पटेल आपल्या भाषणात पुढे म्हणाले,बांबूची चळवळ ही राज्य आणि देशपातळीवर पोहोचली असुन पालघर जिल्हा प्रशासनाने बांबू लागवडी बाबत चांगला दृष्टिकोन स्विकारला आहे. बांबूच्या माध्यमातून निश्चितपणे पालघर जिल्ह्याचा कायापालट होऊ शकतो.ही चळवळ पुढे नेण्यासाठी शासन स्तरावरून जी काही मदत आणि मार्गदर्शन आवश्यक आहे ते निश्चितपणे माझ्याकडून दिले जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
पारंपारिक भात शेतीचे गणित शेतकऱ्यांच्या उपस्थितीत उलगडून सांगत न परवडणाऱ्या भातशेतीपेक्षा सात लाख चार हजार रु.चे अनुदान घेऊन केलेली बांबूची शेती,आदिवासींचे आणि शेतकऱ्यांचे जीवन बदलू शकते.वातावरण बदलाचे संकट रोखण्यासाठी बांबूची लागवड महत्त्वाची आहे.बांबूमध्ये सर्वाधिक प्राणवायू निर्मिती आणि कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेण्याची क्षमता आहे.बांबू लागवडीसाठी खड्डे,रोपे, देखभालीचा खर्च सर्व शासन स्तरावरून अनुदानाच्या रूपाने शेतकऱ्यांना मिळणार आहे.धानिवरी गावाने सहकार्य दाखवून १ हजार बांबू उत्पादक शेतकरी उभे केल्यास आपण केंद्राच्या योजनेतून बांबूचे युनिट याच गावात उभे करू,त्याचबरोबर महिला बचत गट आणि स्वयंरोजगाराच्या संधी गावातच निर्माण करण्यात येतील.त्यासाठी शक्य झाल्यास गाव देखील दत्तक घेण्याची आपली तयारी असल्याचे पाशा पटेल यांनी यावेळी सांगितले.तसेच बांबू पासून विविध प्रकारचे इंधन निर्मिती करणे शक्य असल्याचे सांगत,त्यासाठी पालघर जिल्ह्यात प्रकल्प उभारून जवळपास दोन लाख टन बांबूची निर्मिती करण्याची आपली तयारी असल्याचे सांगितले.
पाशा पटेल म्हणाले की, धानिवरी गावातून बांबू लागवडीचा शुभारंभ होत आहे.प्रशासनाला फक्त योजना राबवून केवळ अनुदानाचा लाभ द्यायचा नाही,तर संपन्न कुटुंब आणि सर्वांगीण ग्रामसमृद्धी हे ध्येय देखील पूर्ण करायचे आहे.त्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. गावाने मिळालेल्या ५० हेक्टर सामूहिक वनपट्ट्यांमध्ये बांबू लागवड करण्याचा निर्णय घेतल्याबद्दलही त्यांनी यावेळी गावकऱ्यांचे आभार मानले.
यावेळी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाने संपन्न मिशन कुटुंब आणि सर्वांगीण ग्रामसमृद्धी हरित महाराष्ट्र अंतर्गत पर्यावरण दिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.शेवटी धानिवरी गावचे सरपंच शैलेश घोडा यांनी यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

