दीपक मोहिते,
“हल्लाबोल,”
शिंदे गटाचे मंत्री अजित पवारांच्या मनमानी कारभारावर नाराज,
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर नुकतीच शिवसेनेच्या मंत्र्यांची एक महत्त्वपूर्व बैठक पार पडली.ही बैठक स्वतंत्रपणे घेण्यात आली असून यावेळी शिंदे यांनी शिवसेनेच्या प्रत्येक मंत्र्यासोबत शिंदे समोरासमोर चर्चा केली.
मात्र,प्रत्येक खात्याचा आढावा घेत असताना शिंदेंच्या सर्व मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबतची नाराजी बोलून दाखवली.त्यामुळे शिंदें गटाचे मंत्री अजित पवार यांच्यावर नाराज असल्याचे उघड झाले आहॆ.अर्थमंत्री असलेले अजित पवार हे निधीचे वाटप करताना दुजाभाव करतात,असा आरोप त्यांच्यावर सतत होत असतो. महाविकास आघाडीत असतानाही पवार यांनी अशाप्रकारचा मनमानी कारभार केला होता.त्यामुळे महायुतीच्या सरकारमध्ये त्याना अर्थखाते त्यांच्याकडे देण्यात येऊ नये,अशी मागणी करण्यात आली होती.पण मुख्यमंत्री फडणवीस यानी शिंदे यांचे महायुती सरकारमध्ये प्रस्थ वाढू नये, यासाठी मंत्र्यांच्या या मागणीला त्यावेळी वाटण्याच्या अक्षता लावल्या.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी आपल्या गटाच्या मंत्री व आमदारांची आढावा बैठक मुंबईत आयोजित केली होती.सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या बैठकीत शिंदे यांनी लवकरात लवकर कामे पूर्ण करा,फाइल पेंडिंग ठेऊ नका,अशा सूचना केल्या.तसेच खात्याची कामे कशी सुरू आहेत,किती कामे झाली व किती कामे प्रस्तावित आहेत,निधी संदर्भात काही अडचणी आहेत का,भविष्यात तुमच्या खात्यातर्फे कोणती महत्वाची कामे हाती घेण्यात येणार आहेत ? अशा सर्व बाबींची माहिती एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत घेतली.लोकोपयोगी कामांवर भर द्या,लवकरात लवकर कामे पूर्ण करा,फाइल पेंडिंग ठेऊ नका,सामान्य लोकांपर्यंत पोहोचा,असा सल्लाही शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना दिला.याविषयी शिंदे यांना माहिती देताना त्यांच्या मंत्र्यांनी अजित पवार,हे आमच्या विकासकामांत खोडा घालत आहेत,असा थेट आरोप करत मंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासमोर अजित पवारांबाबत पाढा वाचला. राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मंत्र्यांसोबत आढावा घेतली.या बैठकीत अनेक मंत्र्यांनी अजित पवार यांच्या विरोधात आवाज उठवला.
आम्हाला निधी मिळणार नसेल तर आम्ही काम कसं करणार ? अशा शब्दात मंत्र्यांनी अजित पवार यांच्याबाबत आपली नाराजी व्यक्त केली.
अजित पवार राज्याचे अर्थमंत्री आहेत,ते जर आम्हाला निधी देणार नसतील तर आम्ही काम कसं करायचं ? अशाप्रकारची चिंता या बैठकीत शिंदेंच्या सर्वच्या सर्व मंत्र्यांनी व्यक्त केली.सरकारमध्ये सर्वांना समान अधिकार मिळायला हवेत,असे काही ज्येष्ठ मंत्र्यांनी बैठकीत बोलून दाखवलं.दरम्यान,मंत्र्यांनी अजित पवार यांच्याबाबत नाराजी व्यक्त केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी देखील मंत्र्यांना महत्त्वाचं आश्वासन दिलंय.मी स्वत: अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलेन आणि मार्ग काढीन.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अजित पवार यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर पूर्वीपासून नाराज आहेत. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये असताना अजित पवार आपल्या मर्जीतील लोकांना भरपूर निधी देत असत,त्यांनी माझ्या खात्याचाही निधी वळवला होता,असे त्यांनी विधानसभेत सांगितले होते.पवार यांच्या अशा वागण्यामुळे त्यांना अर्थमंत्रीपद देऊ नये,असे त्यांनी फडणवीस यांना सुचवले होते.पण फडणवीस यांनी त्यावेळी ” शत्रूचा शत्रू तो आपला मित्र,” या ब्रिटिश नितीनुसार त्यांनी दुर्लक्ष केले.त्यामुळे अजित पवार यांना आता मोकळे रान मिळाले आहॆ.

