वसंत भोईर,वाडा
टायर रिसायकलिंग कारखाने दिवसा बंद,रात्री सुरू…
टायर रिसायकलिंग करणाऱ्या कंपन्यांमुळे वाडा तालुक्यातील हवा दूषित झाली आहॆ.त्यामुळे वडवली गावाच्या हद्दीत असलेल्या दहा प्रदूषणकारी कारखाने पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंद केले होते.बंद केलेले हे कारखाने शासनाचे आदेश धाब्यावर बसवून रात्री खुलेआम चालू असल्याचे येथील स्थानिक ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले आहे.
तालुक्यातील वडवली या ग्रामपंचायतीच्या हद्दीत जुने टायर जाळून त्यापासून ऑइल व तारा काढून त्याची विक्री मोठ्या प्रमाणात केली जात आहे.त्यातून बाहेर पडणारे प्रदूषित रासायनिक सांडपाणी हे येथील नैसर्गिक नाल्यात टाकले जात असल्याने नाल्यातील मासे मृत्यूमुखी पडतात.तर दूषित पाणी प्यायल्याने आजवर अनेक जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत.या प्रदूषणाबाबत अनेकदा पत्रव्यवहार करूनही प्रदूषण नियंत्रण मंडळ डोळे झाक करत आहे.त्यामुळे त्याचा त्रास येथील स्थानिकांना सहन करावा लागत आहे.
गेल्या फेब्रु.महिन्यामध्ये येथील एम.डी.पायरोलिसेस या कंपनीत बॉयलरचा स्फोट झाला आणि या स्फोटात संपूर्ण कंपनी जळून खाक झाली.या दुर्घटनेमध्ये दोन कामगार व त्यांची दोन मुले असे चार जण ठार झाले होते. तेव्हा हे प्रकरण चव्हाट्यावर आले आणि प्रशासनाने कारखाने बंद केले.तरीदेखील आदेशाची पायमल्ली करत प्रदूषणकारी हे सर्व कारखाने रात्री सुरू असल्याचे येथील ग्रामस्थ कल्पेश पाटील यांनी उघडकीस आणले आहे.मात्र प्रशासनाकडून त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मी या ठिकाणी पंधरा दिवसांपूर्वी हजर झालो आहे. यासंदर्भात मला अजून पूर्ण माहिती नाही.सविस्तर माहिती घेऊन योग्य ती कारवाई करू.
– जे.एस.हजारे,प्रादेशिक अधिकारी प्रदूषण नियंत्रण मंडळ,कल्याण
.

