दीपक मोहिते,
दोघा भावांनी एकत्र आले पाहिजे, अन्यथा विधानसभा निवडणुकीची पुनरावृत्ती अटळ आहॆ,
” हल्लाबोल,”
गेली अनेक वर्षे राजकारणात सक्रिय असलेली अनेक कुटुंबे गृहकलहामुळे दुभंगली गेली.त्यामध्ये ठाकरे,पवार,मुंडे व अन्य काही कुटुंबाचा समावेश आहे.अनेक वर्षे उलटून गेल्यानंतर आता ही कुटुंबे पुन्हा एकत्र येत असल्याच्या वावड्या उठू लागल्या आहेत.पण ते एकत्र येतील,असे वाटत नाही.यावर आम्ही अनेक लेख लिहिले,कारण सत्ता, स्वार्थ व नाती,ही कधीही एकत्र नांदत नाहीत.पण या लोकांचे एकत्र येणे,हा विषय चघळायला मिळाल्यामुळे अनेक वृत्तपत्राच्या कार्यालयाने आपल्या दैनिकाचे रकानेच्या रकाने भरले.वृत्तवाहिन्या व युट्युबर मंडळींनी त्याचा पुरेपूर फायदा उचलला. त्याचवेळी आमच्या वेबपोर्टलने मात्र हे कसे अशक्य आहे,ते आपल्या लेखातून वाचकांसमोर मांडले.असो,मात्र आज ही चर्चा कडीकुलपात बंद झाली आहे.
ठाकरे व पवार या दोन कुटुंबात दिलजमाई व्हावी,यासाठी अनेक जण देव पाण्यात टाकून बसले आहेत.पण बदलत्या परिस्थितीमुळे सध्या सर्वत्र शांतता पसरली आहे.राज ठाकरे दीड दशकांपूर्वी शिवसेनेतून बाहेर पडले तर अजित पवार आपल्यावर ईडीची कारवाई होऊ नये,यासाठी त्यांनी आपल्या काकांची साथ सोडली.स्वार्थ व सत्तेची हाव तर होतीच,पण त्याचवेळी ईडीची भितीही होती.त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संधी साधली व त्यांनी शरद पवार यांना ” दे धक्का,” तंत्राचा अवलंब करत त्यांच्या राजकीय वाटचालीला चांगलाच ब्रेक लावला.सत्तेच्या राजकारणात भावनिक नात्याला काडीची किंमत नसते,हे एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या एकंदरीत वागण्यावरून सिद्ध झाले.दरम्यान,विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या व पालघर जिल्ह्याच्या राजकारणात या दोन कुटुंबासारखेच एक वादळ घोंगवले.गेली तीन दशके वसईच्या राजकारणावर निर्विवाद वर्चस्व राखणाऱ्या बहुजन विकास आघाडी या पक्षावर येऊन ते आदळले.पक्षाचे माजी महापौर राजीव पाटील यांनी पक्ष सोडण्यासंदर्भात छुप्या पद्धतीने हालचाली सुरू केल्या.कालांतराने त्या हालचाली स्पष्टपणे दिसू लागल्यानंतर सगळीकडे चर्चेला उधाण आले.मात्र दुसरीकडे त्यांचे छोटे बंधू व पक्षाचे सर्वेसर्वा माजी आ. हितेंद्र ठाकूर,हे मात्र या ज्वलंत विषयावर मौन बाळगून राहिले.कुटुंबातील या वादाचा फायदा विरोधी पक्षाला होईल,हे लक्षात आल्यानंतर आपापसातील मतभेद सामोपचाराने मिटवण्यासाठी कुटंबातील अनेक जण व त्यांच्या निकटवर्तीयांनी पुढाकार घेतला व चहाच्या कपातील हे वादळ,तात्पुरते स्वरूपात निवळले.मात्र या सर्व घडामोडीनंतर वसईकर व नालासोपारवासीयांमध्ये जे संकेत जायचे होते,ते गेलेच.त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाला तीनही जागा गमवाव्या लागल्या.या पराभवाच्या मागे जी कारणे होती,त्यापैकी हे एक महत्वाचे कारण होते.या पराभवाच्या मागे अनेक कारणे होती,पण हे कारण पक्षाच्या प्रभावाला कारणीभूत ठरले.विधानसभा निवडणुका होऊन सहा महिने झाले,आता महानगरपालिका निवडणुका तोंडावर आल्या आहेत.पण या दोघा भावांमध्ये दिलजमाई झाल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही.कार्यकर्त्यांच्या बॅनर्सवर दोघा भावांचे फोटो पाहायला मिळतात.पण जसे ते बनर्सवर एकत्र पाहायला मिळतात,तसे ते वास्तवात एकत्र आहेत,असे चित्र मात्र गेल्या सहा महिन्यांत एकदाही पाहायला मिळाले नाही.महानगरपालिकेच्याआगामी निवडणुका येत्या ऑक्टो.किंवा नोव्हें.महिन्यात लागण्याची शक्यता आहे.त्यामुळे या दोघा भावांनी एकत्रपणे कामाला लागायला हवे.तसे न झाल्यास याही निवडणुकीत पक्षाला धोका निर्माण होऊ शकतो.गृहकलहामुळे धीरूभाई अंबानी,इंदिरा गांधी,हिरानंदानी ही उद्योगपतींच्या कुटंबाची साम्राज्ये देखील लयाला गेली.हा इतिहास लक्षात घेऊन या दोघा भावानी आपापसातील मतभेदाना मूठमाती देऊन एकत्र आले पाहिजे.अन्यथा विधानसभा निवडणुकीची पुनरावृत्ती अटळ आहॆ.

