नदीम शेख,पालघर
पालघर जिल्ह्यात खरीप हंगाम भातबियाणे वाटपाचा शुभारंभ,
पालघर जिल्हा परिषद अंतर्गत खरीप हंगामासाठी भातबियाणे वाटपाचा शुभारंभ काल पंचायत समिती पालघर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या हस्ते करण्यात आला.या कार्यक्रमात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे,जिल्हा कृषि विकास अधिकारी सोमनाथ पिंजारी, गटविकास अधिकारी ( प्र. ) बापुराव नाळे आणि कृषी विभागातील अधिकारी तसेच अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा परिषद पालघरच्या कृषी विभागातर्फे गेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर भात बियाणे वाटप करण्यात येत आहे.यावर्षीही या उपक्रमात मोठ्या प्रमाणावर बियाण्यांचे वितरण करण्यात येणार असून,जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती ( पालघर, डहाणू,तलासरी,विक्रमगड, जव्हार,मोखाडा,वसई,वाडा ) कार्यालयांमध्ये भातबियाणे पोहोचले असून वाटप सुरू झाले आहे.
जिल्हा परिषद सेस फंडांतर्गत ४९ लाख रु.च्या योजनेंतर्गत महाबीजकडून ८४६ क्विंटल आणि बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून ९३४ क्विंटल,अशा एकूण १ हजार ७८० क्विंटल भात बियाण्यांची खरेदी करण्यात आले आहे.यामध्ये ५० % निधी लाभार्थी शेतकऱ्यांकडून तर ५० % जिल्हा परिषद सेस फंडामधून भागवण्यात येत आहे.यामध्ये कर्जत ३,कर्जत ५, कर्जत ७,सुवर्णा,एमटीयू १०१०,को ५१,एमटीयू ११५३, कर्जत ९, आरटीएन-६,आरटीएन-७ या सुधारित वाणांचा समावेश करण्यात आला आहे.अंदाजे ६ हजार शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत थेट लाभ मिळणार आहे.
याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला.त्यांनी शेतकऱ्यांनी या योजनांचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा आणि अधिक उत्पादन मिळवावे,असे आवाहन यावेळी केले.तर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे यांनी शेतकऱ्यांना उत्तम उत्पादनासाठी शुभेच्छा देत,योग्य वाणांची निवड करून शेतीत भरघोस उत्पन्न घ्यावे,असे सांगितले.
यावेळी कृषी अधिकारी स्मिता पाटील,विस्तार अधिकारी सुनिल म्हात्रे,विजयकुमार पोटे, दीपाली चव्हाण तसेच परिसरातील शेतकरी बंधू-भगिनी उपस्थित होते.

