दीपक मोहिते
वसई विरार शहर मनपा ; भाजप सर्वस्व पणाला लावणार…
गेल्या पाच दिवसात news27.in या वेबपोर्टलने महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत प्रमुख पक्षांची कशी भूमिका असेल,या विषयी अनेक पैलू वाचकांसमोर आणले. वास्तविक या विषयी त्यांच्या प्रमुख नेत्यांनी भरभरून बोलायला हवे होते.पण दुर्देवाने तसे घडले नाही. त्यामुळे या सर्व मुलाखतीमध्ये दोन्ही बाजू समोर येऊ शकल्या नाहीत.या पक्षाच्या नेत्यांशी आम्ही सातत्याने संपर्क करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला,पण शिवसेनेचे ( एकनाथ शिंदे गट ) जिल्हाध्यक्ष वगळता एकाही नेत्यांनी तशी हिंमत दाखवली नाही.त्यामुळे त्यांच्या पक्षातील असंतुष्ट आत्म्याचा आम्हाला आधार घ्यावा लागला.या माध्यमातून पक्षाची सद्यस्थिती,निवडणुकीची तयारी,पक्षातील अंतर्गत मतभेद व निवडणुकीतील पराभवानंतर पक्षात आलेली मरगळ,इ.विषयी मतदारांना भरीव माहिती मिळू शकली.दरम्यान गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या अनपेक्षित विजयामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विश्वास दुणावला आहॆ.काल या पक्षाचे राष्ट्रीय नेते व गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यातील महानगरपालिका निवडणुका स्वबळावर ( मैत्रीपूर्ण लढत ) लढवण्याचे संकेत दिले आहेत. पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये होत असलेल्या वाढीमुळे तसेच सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबडीची मालकी आपल्याकडेच राहावी, यासाठी पक्षाचे वरिष्ठ नेते अधून मधून असे संकेत देत असतात.असो,काल आमच्या वेबपोर्टलच्या स्टाफने भाजपचे नवनिर्वाचित आ.राजन नाईक यांच्या मुलाखतीसाठी संपर्क केला होता.त्यांच्या मागणीनुसार त्यांना काल सकाळी मुलाखतीसाठी प्रश्नावली देखील पाठवली.अपेक्षा होती की,त्या सर्व प्रश्नाची उत्तरे संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत आम्हाला मिळतील.पण आमच्या पदरी निराशा पडली.अखेर काल रात्री आम्ही तालुक्यात भाजपचे जुनेजाणते भाजपचे ज्येष्ठ नेते यांना गाठले.या ज्येष्ठ नेत्याने आपले उभे आयुष्य पक्षासाठी खर्ची घातले, तत्कालीन खा.राम नाईक यांना त्यांनी आयुष्यभर साथ दिली,अशा कार्यकर्त्यांशी आम्ही संपर्क साधला.या ज्येष्ठ कार्यकर्त्यांची ” असंतुष्ट आत्मे,” या वर्गात समावेश नाही.त्यांचे आपल्या पक्षाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक असाच आहॆ.मात्र पक्षात बाहेरून येणाऱ्यांची होत असलेल्या खोगीरभरतीमुळे ते सध्या चिंतेत सापडले आहेत.आमच्या news27.in शी ते भरभरून बोलले.ती सर्व माहिती आम्ही आज प्रसिद्ध करत आहोत.
प्रश्नावली,
News27.in – एकेकाळी तालुक्यात तुमच्या पक्षाची अवस्था अतिशय बिकट होती. २०१४ साली केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तुमचे सरकार आले व तुमच्या पक्षाला अनेक राज्यात सुगीचे दिवस आले.त्याला महाराष्ट्र राज्य देखील अपवाद ठरू शकला नाही.२०१९ साली राज्यात असलेली सत्ता हातून गेल्यानंतरही पक्षवाढीची प्रक्रिया निरंतर सुरूच राहिली. त्यानंतर नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत वसई व नालासोपारा मतदारसंघात तुम्हाला अभूतपूर्व विजय मिळाला.अल्पावधीत पक्षाकडे नवीन कार्यकर्त्यांचा ओघ सुरू झाला.या सर्व वाटचालीसंदर्भात तुम्ही काय सांगाल ?
ज्येष्ठ कार्यकर्ते – लोकसभा वगळता आजवर इतर सर्व निवडणुकामध्ये आम्हाला सतत पराभवाला सामोरे जावे लागले.काही किरकोळ ग्रामपंचायतीचा अपवाद वगळता आम्हाला निवडणुका जिंकणे शक्य झाले नाही. महानगरपालिकेच्या दोन निवडणुकीपैकी पहिल्या निवडणुकीत आमची पाटी कोरी राहिली,तर दुसऱ्या निवडणुकीत आमचा एक उमेदवार निवडून आला. ( किरण भोईर -पूर्वाश्रमीचे बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक ) अशी आमच्या पक्षाची स्थिती होती.गेल्या दोन ते तीन वर्षात पक्षाने कात टाकली खरी,पण पक्षाने बाळसं धरले,असे त्यास म्हणता येणार नाही.त्याऐवजी पक्षाला सूज आली आहॆ,असे म्हंटल्यास ते चुकिचे ठरू नये.
News27.in -येत्या ऑक्टो. किंवा नोव्हें.महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत.त्या लढवण्यासाठी पक्षाची कशी तयारी आहे.महायुतीमधील घटक पक्षांना सोबत घेऊन की स्वबळावर लढणार आहात ?
ज्येष्ठ पदाधिकारी – महायुतीच्या माध्यमातून की स्वबळावर ? या प्रश्नाचे उत्तर देण्याइतका मी मोठा नाही.या प्रश्नाचे उत्तर आमचे राज्यस्तरीय नेतेच देऊ शकतील.मी याविषयी एकच सांगू शकतो,की ज्या कार्यकर्त्यांनी पक्षासाठी खस्ता खाल्या,त्या कार्यकर्त्यावर या निवडणुकीत अन्याय होता कामा नये.त्यांना आगामी निवडणूकीत प्राधान्याने उमेदवारी दिली पाहिजे.
News27.in – तुम्ही जर वेगळी चूल मांडायचे ठरवले तर तेवढे उमेदवार तुमच्या पक्षाकडे आहेत का ? आणि अशा प्रकारचा निर्णय झाल्यास बहुजन विकास आघाडीला त्याचा फायदा होईल,असे तुम्हाला वाटत नाही का ?
ज्येष्ठ कार्यकर्ते – बहुजन विकास आघाडी,आता लोकांच्या मनातून उतरली आहॆ.महानगरपालिका निवडणुका एकदा जाहीर झाल्या की त्यांच्या पक्षातील नाराज व उमेदवारी न मिळालेल्या कार्यकर्त्यांची पळापळ सुरू होईल व ती आमच्या पथ्यावर पडणारी असेल.आजच्या घडीला भाजपमध्ये उमेदवारांची कमतरता नाही.
News27.in – उद्धव ठाकरे व राज ठाकरे,या दोघांनी एकत्र येण्याचे ठरवले तर काही फरक पडेल,असे तुम्हाला वाटते का ?
ज्येष्ठ कार्यकर्ते – बिलकुल नाही,तालुक्यात मनसेचे अस्तित्व नाममात्र आहॆ. पक्षफुटीनंतर शिवसेना ( उबाठा ) अत्यंत कमकुवत झाली आहॆ.आजच्या घडीला तालुक्यात या पक्षाकडे खंबीर असे नेतृत्व नाही.त्यामुळे हे दोन्ही पक्ष एकत्र आले तरी फार काही घडेल,असे मला वाटत नाही.
News27.in – महानगरपालिकेच्या गेल्या दोन निवडणुकामध्ये तुमच्या पक्षाला भरीव कामगिरी करता आली नाही.लोकसभा व विधानसभा निवडणुका जिंकल्यामुळे या निवडणुकीत तुम्ही बाजी मारू शकाल का ?
ज्येष्ठ कार्यकर्ते – हो,नक्कीच मारू,कारण इतर पक्षाची सध्याची अवस्था लक्षात घेता,महानगरपालिकेत आमचीच सत्ता स्थापन होईल.आज बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहॆ.त्यांचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते आमच्या पक्षाच्या संपर्कात आहेत.पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष आ.रविंद्र चव्हाण व पालकमंत्री गणेश नाईक ऐन निवडणुकीत जी स्ट्रॅटेजी वापरतील,ती पक्षाला विजयस्तंभाकडे घेऊन जाणारी असेल.त्यामुळे महानगपालिकेची ही तिसरी निवडणूक केवळ आमचीच असेल.
News27.in – लोकसभा व विधानसभा निवडणुकीत विरोधकांना जो फटका बसला,तशीच स्थिती या निवडणुकीत असेल,असे तुम्हाला वाटते का ?
ज्येष्ठ पदाधिकारी – हो,अगदी तशीच स्थिती असेल.या निवडणुकीत आमचा पक्ष उमेदवारी देताना उमेदवाराचे चारित्र्य,जनमानसातील त्याची प्रतिमा,परिसर विकासकामाचा अभ्यास व पक्षकार्यात त्याचे असलेले योगदान,असे निकष लावतील व ते पक्षाला फायदेशीर ठरतील,असे मला वाटते.
News27.in -विविध पक्षाचे अनेक कार्यकर्ते तुमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येते.त्यांना या निवडणुकीत उमेदवारी देण्यात येईल का ? पक्षात आल्या आल्या त्यांना उमेदवारीची लॉटरी लागल्यास प्रामाणिक कार्यकर्त्यावर अन्याय होईल,असे तुम्हाला वाटते का ?
ज्येष्ठ कार्यकर्ते – होय,बाहेरून आलेल्याना उमेदवारी मिळाल्यास जुनेजाणते कार्यकर्ते नाराज होण्याची शक्यता अधिक आहॆ.त्यामुळे वरिष्ठानी तिकीटवाटप करताना सावधगिरी बाळगायला हवी.पक्षाचा पाया हा जुनाजाणता कार्यकर्ता आहॆ,हे त्यांनी विसरता कामा नये.
News27.in – अनेक जुने पदाधिकारी सध्या तुमच्या पक्षाच्या दैनंदिन कामकाजापासून दुरावल्याचे पाहायला मिळते,अशी परिस्थिती का निर्माण झाली,तुम्हाला काय वाटते ?
ज्येष्ठ कार्यकर्ते – खरं आहॆ ते, सध्या पक्षात हवशे व नवश्यांची भाऊगर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहॆ.त्यामुळे आपल्याला सावत्रपणाची वागणूक मिळत असल्याचा आरोप पक्षाच्या अनेक प्रामाणिक कार्यकर्त्याकडून केला जातो.त्याची दखल वरिष्ठानी घ्यायला हवी.
News27.in – गेली तीन दशके वसईच्या राजकारणात स्वतःचा दबदबा राखणाऱ्या बहुजन विकास आघाडीने जर महाविकास आघाडीच्या माध्यमातून या निवडणुका लढवायच्या ठरवल्या तर त्याचा फटका तुमच्या पक्षाला बसू शकेल का ?
ज्येष्ठ कार्यकर्ते – काहीही फरक पडणार नाही.ज्या पक्षाने आजवर कधीही इतर पक्षाच्या पंखाखाली काम केले नाही.तो पक्ष युती करेल,असे वाटत नाही.काँग्रेस पक्षाने तसा प्रयत्न करून पाहिला.बहुजन विकास आघाडीने काँग्रेसला त्या निवडणुकीत ९ ते १० जागा सोडल्या.पण त्यांचा पराभव करण्यासाठी त्यांनी आपल्या लोकांना अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरवले व काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव घडवून आणला. २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमच्या पक्षाच्या एका नेत्याला अपक्ष म्हणून बोईसर मतदारसंघात उभे केले व सेनेच्या उमेदवाराचा पराभव घडवून आणला.याकामी त्यांना आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने देखील बहुजन विकास आघाडीला भरीव मदत केली होती.त्यावेळी जर हा अपक्ष उमेदवार रिंगणात नसता तर सेनेचा उमेदवार हमखास निवडून आला असता,हे सारे अनुभव लक्षात घेता महाविकास आघाडी सोबत त्यांची युती होईल,असे वाटत नाही.
News27.in – शेवटचा प्रश्न या निवडणुकीत तुमच्या पक्षाला किती जागा जिंकू शकाल,तुम्हाला काय वाटते ?
ज्येष्ठ कार्यकर्ते – तालुक्यातील एकंदरीत राजकीय परिस्थिती लक्षात घेता आम्ही ९० ते ९५ जागा जिंकू शकू,असे मला वाटते.ज्या कार्यकर्त्यांनी गेली अनेक वर्षे पक्षवाढीसाठी स्वतःला झोकून दिले,त्यांना पक्षाने संधी दिल्यास ते नक्कीच संधीचे सोनं करतील, असे मला वाटते.

