सुरेश वैद्य,पालघर
पालघर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे पूर्ण,
नुकसान झाल्यामुळे बाधितांना मदत देण्यासाठी रु.१ कोटी २० लाख १५ हजार १९५ इतका निधी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आले आहे.दरम्यान जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागातील नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत.
या कालावधीमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे बागायत शेतीचे १ हजार ९२३ शेतकऱ्यांचे ५३७.६८ हेक्टर क्षेत्राचे ३३ % हून अधिक नुकसान झाले.फळपिकांचे ५ हजार ५९८ शेतकऱ्यांचे २ हजार १६२ हेक्टर क्षेत्राचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाल्याने नुकसानीचे पंचनामे तलाठी,ग्रामवसेवक व कृषिसहायक यांच्याद्वारे करण्यात आले आहेत. बाधितांना मदत देण्यासाठी रु.९ कोटी २३ लाख ७७ हजार ८०० इतका निधी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून उपलब्ध करुन देण्यासाठीचा शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
वीस दिवसापूर्वी झालेला अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यातील ९९ बोटींचे अंशतः नुकसान झालेले असून २ बोटींचे पुर्णपणे असे एकुण १०१ बोटींचे नुकसान झाले असुन त्यांना मदत करण्यासाठी एकुण रू.६ लाख २४ हजार इतक्या निधीची आवश्यकता आहे.तसेच २ बोटींच्या जाळ्यांचे पुर्णतः नुकसान झाले असल्यानमुळे शासन निर्णयानुसार ८ हजार रु. इतक्या निधीची आवश्यकता आहे. बाधितांना मदत करण्यासाठी रु.६ लाख ३२ हजार इतका निधी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे.
तसेच सुक्या मासळीच्या नुकसानीसंदर्भात मदत देण्यासाठी महसुल व वनविभाग,शासन निर्णयामध्ये कोणतीही तरतुद नसल्याने विशेष बाब म्हणून मदत करण्यासाठी पालकमंत्री गणेश नाईक यांनी मुख्यमंत्री, मत्सव्यवसायमंत्री तसेच मदत व पुनर्वसनमंत्री यांच्याकडे आग्रहाची विनंती केली आहे.
वर नमुद केल्यानुसार घरे, झोपड्या, शेतीपिके ,फळपिके,बोटी व सुकी मासळी यांच्या नुकसान भरपाईसाठी शासनाकडून निधी प्राप्त होताच संबंधित तहसीलदार यांच्यातर्फे बाधितांना मदतीचे वाटप करण्यात येणार आहे.
तसेच चार दिवसापूर्वी पालघर जिल्ह्यात पुन्हा वादळी वाऱ्यांमुळे १ हजार ३० घरांचे अंशत: नुकसान झालेले असून त्यांचे पंचनामे करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

