जव्हार,प्रतिनिधी
जव्हार तहसीलदा्रांकडून नुकसानग्रस्त गावांची पाहणी,
जव्हार तालुक्यात दोन दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने अनेक गावांमध्ये घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.या नुकसानीची पाहणी करण्यासाठी तहसीलदार गमन गावित यांनी गावाचा दौरा केला.
तहसीलदार गावित यांनी ग्रामपंचायत वावर,जामसर, दाभलोन आणि किरमिरा या गावांमध्ये जाऊन प्रत्यक्ष पंचनामे सुरू असलेल्या ठिकाणी भेट दिली.त्यांनी नुकसानग्रस्त लाभार्थ्यांशी संवाद साधत त्यांचे दुःख जाणून घेतले आणि शासनाच्या वतीने शक्य ती मदत लवकरच पोहोचवण्यात येईल,असे आश्वासन दिले.
यावेळी किरमीरा गावचे नुकसानग्रस्त लाभार्थी विलास गणपत दळवी यांनी सांगितले की, “ वादळी वाऱ्यामुळे माझ्या घराचे छप्पर उडून गेले असून संसारोपयोगी वस्तूंचेही मोठे नुकसान झाले आहे.अशा परिस्थितीमध्ये तहसीलदारांनी दिलेले आश्वासन दिलासा देणारी आहे.”
तहसील कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून तत्काळ पंचनाम्याचे काम सुरू करण्यात आले असून संबंधित ग्रामपंचायत अधिकारी,ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.तहसीलदार गावित म्हणाले, “ वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची योग्य प्रकारे नोंद घेऊन शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन निधीअंतर्गत लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात येईल.”
या दौऱ्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रशासनाबाबत विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून,गावकऱ्यांनी तहसीलदारांच्या तत्परतेचे कौतुक केले आहे.

