दिपक मोहिते,
वसई तालुका शिवसेना ( उबाठा ) सध्या प्रभावी नेतृत्वाच्या प्रतिक्षेत,
परवा आमच्या वेबपोर्टलने शिवसेनेचे ( एकनाथ शिंदे ) जिल्हाध्यक्ष निलेश तेंडुलकर व काल राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजित पवार ) गटाच्या एका नाराज माजी पदाधिकाऱ्याने नांव न छापण्याच्या अटीवर स्फ़ोटक मुलाखत दिली. त्यानंतर वेबपोर्टलने शिवसेनेचे ( उबाठा ) जिल्हाध्यक्ष प्रवीण म्हाप्रळकर यांच्याशी मुलाखतीसाठी संपर्क केला.अपेक्षेप्रमाणे त्यांच्याकडून मुलाखत देण्याबाबत टाळाटाळ करण्यात आली.मी पालघर लोकसभा संघटकाशी बोलतो त्यानंतर मुलाखत देतो,असे सांगून आमच्या स्टाफची त्यांनी बोळवण केली.तरीही आम्ही त्यांना प्रश्नावली पाठवली.पण त्यांचा काही प्रतिसाद मिळाला नाही.त्यामुळे आम्ही त्यांच्या पक्षाच्या एका नाराज माजी पदाधिकाऱ्याला गाठले,पण त्यांनीही प्रारंभी आडेवेढे घेतले.पण त्यांची समजूत घालण्यात आम्ही यशस्वी ठरलो व त्यांनी माझे नांव न छापणे व माझे नांव कोणालाही कळता कामा नये, अशा दोन अटीवर मुलाखत देण्याची तयारी दर्शवली. त्यांनी सिग्नल दिल्यामुळे आमच्या स्टाफचा जीव भांड्यात पडला.आम्ही लगबगीने त्यांना प्रश्नावली पाठवून दिली.त्यांनी जी मुलाखत दिली,ती आम्ही जशीच्या तशी छापत आहोत.
प्रश्नावली,
News27.in – स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका उंबरठ्यावर आल्या आहेत.तालुक्यातील सर्व पक्षांनी जोरदार तयारी चालवली आहे.पण तुमच्या पक्षात काहीही हालचाल दिसत नाही.ही निवडणूक लढवण्यासाठी पक्षाने कशी तयारी केली आहे.महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढणार की ” एकला चलो रे,” अशी भूमिका अवलंबणार ?
नाराज माजी पदाधिकारी – गेल्या दोन निवडणुकीत आमचा दारुण पराभव झाल्यामुळे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यात प्रचंड मरगळ आली आहे. पक्ष सध्या बिकट अवस्थेतून चालला आहे.त्यामुळे याविषयी पक्षात आजच्या घडीला कोणतीही चर्चा सुरू नाही.
news27.in – तुम्ही जर वेगळी चूल मांडायचे ठरवले तर तुमच्याकडे पुरेसे उमेदवार आहेत का ?
नाराज माजी पदाधिकारी – आज पक्षाची आर्थिक स्थिती पूर्णपणे खालावली आहे.तसेच कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही.निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांनी अनामत रकमा वाचवल्या तर खूप काही मिळवल्याचे समाधान मिळेल.पण प्राप्त परिस्थिनी लक्षात घेता ते शक्य नाही.भाजप व शिंदे गटाला रोखणे,सध्या तरी तालुक्यातील एकाही राजकीय पक्षाला शक्य नाही.त्यामुळे वेगळी चूल मांडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
News27.in – उद्धव ठाकरे व राज ठाकरे,या दोघांनी एकत्र येण्याचे ठरवले तर जागावाटपात मोठा भाऊ कोण असेल ?
नाराज माजी पदाधिकारी – हे दोघे भाऊ एकत्र येतील,असे मला तरी वाटत नाही.वरिष्ठ पातळीवर जरी निर्णय झाला तरी स्थानिक पातळीवरील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मने जुळणार नाहीत.तिकीट वाटपावरून आम्ही एकमेकांच्या उरावर बसू.निकाल कसा लागणार आहे,हे माहीत असूनही हे दोन्ही पक्ष आपल्या पक्षाची ताकद अधिक असल्याचे सांगत खेचाखेची करतील.
news27.in – महानगरपालिकेच्या मागील दोन निवडणुकामध्ये तुमच्या पक्षाला भरीव कामगिरी करता आली नाही.यंदा त्याचीच पुनरावृत्ती होईल,अशी शक्यता वाटते का ?
नाराज माजी पदाधिकारी – यात तिळमात्र शंका नाही.कारण आमच्या पक्षात गेल्या तीन दशकात कधीही एकवाक्यता व एकजीनसीपणा पाहायला मिळाला नाही.आणि तो याही निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार नाही.
news27.in – लोकसभा निवडणुकीत पक्षाला जो फटका बसला,तसेच भाजपचा निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने विजय झाला.मतांमध्ये असलेली तफावत भरून काढणे पक्षाला शक्य होईल का ? त्यामुळे आम्ही तफावत भरून काढू किंवा नाही,यावर बोलणे योग्य होणार नाही.
news27.in – पक्षफुटीनंतर पालघर जिल्ह्यात तुमचा पक्ष क्षीण झाल्याचे पाहायला मिळते.अशा परिस्थितीमध्ये पक्षाला पुन्हा उभारी मिळेल का ? याविषयी तुम्हाला काय वाटते ?
नाराज माजी पदाधिकारी – अशक्य आहे,कारण पदाधिकारी व शिवसैनिकांची मानसिक स्थिती पार लयाला गेली आहे.निवडणूक लढवणे व त्या जिंकणे,आपल्याला आता शक्य होणार नाही,असे त्यांचे ठाम मत बनले आहे.कारण पक्षाकडे आता दमदार नेतृत्वाचा अभाव आहे.” पक्षाला उभारी,” हे दोन शब्द शिवसैनिकांच्या शब्दकोशात नाही.
news27.in – दीड वर्षांपूर्वी पक्षात अनेक फेरबदल करण्यात आले होते.बहुजन विकास आघाडीमधील एका कार्यकर्त्याने तुमच्या पक्षात प्रवेश केला.त्याला पक्षात आल्या आल्या अचानक जिल्हाध्यक्षपदाची लॉटरी लागली.त्या व्यक्तीने पैश्याच्या जोरावर ते पद मिळवल्याचा आरोप जुन्याजाणत्या पदाधिकाऱ्यांनी केला होता.त्या आरोपामध्ये किती तथ्य होते ?
नाराज माजी पदाधिकारी – असा आरोप करण्यामध्ये माझाही समावेश होता.कोणालाही विश्वासात न घेता बाहेरून आलेल्या व्यक्तीला आमचे वरिष्ठ नेते थेट जिल्हाध्यक्ष पद देतात,हे आम्हा शिवसैनिकावर अन्यायकरणारे होते.आम्ही पक्षासाठी वर्षानुवर्षे भांडी घासली,धुणी धुतली व पक्ष कष्टाने उभा केला.पक्षाकडून कधीही आणि कसलीही अपेक्षा केली नाही.अशावेळी बाहेरून आलेल्या व्यक्तीकडे पैसा आहे,हे पाहून जर तुम्ही पदे वाटत असाल तर ते आम्ही का म्हणून सहन करायचं ? बाळासाहेब हयात असताना अस कधीच घडलं नव्हतं.बाळासाहेबाना शिवसैनिक मोठा वाटत असे,पैसा नाही.त्यामुळे आम्ही वरिष्टांच्या या निर्णयाला जोरदार विरोध केला.
News27.in – अनेक जुने पदाधिकारी सध्या पक्षाच्या दैनंदिन कामकाजापासून दुरावल्याचे पाहायला मिळते,अशी परिस्थिती का निर्माण झाली, तुम्हाला काय वाटते ?
नाराज माजी पदाधिकारी –
पक्षफुटीनंतर पक्षाची अवस्था अत्यंत दयनीय,अशी झाली.नंतरच्या काळात कोणीही पक्ष सावरण्याचा प्रयत्न केला नाही.पक्षाने कोणतेही उपक्रम राबवले नाहीत.त्यामुळे अनेक पदाधिकारी व शिवसैनिक पक्षापासून दुरावले.सैन्याला सेनापतीची गरज असते,तो नसला की सैन्य सैरभैर होत असते.आज तीच परिस्थिती आमच्या पक्षाची झाली आहे.
news27.in – महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत पक्ष किती जागा लढवणार आहे ? तुम्हाला काय वाटते ?
नाराज माजी पदाधिकारी – याविषयी आजच्या घडीला काहीच सांगता येणार नाही.पण निवडणूक लढवण्यासाठी कोणीही इच्छुक नाही.कारण निवडणूक लढवण्यासाठी लागणारा पैसा कुठून आणायचा ? असा प्रश्न प्रत्येक शिवसैनिकाला भेडसावत आहे.
news27.in – गेली तीन दशके वसईच्या राजकारणात स्वतःचा दबदबा राखणाऱ्या बहुजन विकास आघाडीने जर महाविकास आघाडीच्या माध्यमातून या निवडणुका लढवायच्या ठरवल्या तर त्याला स्थानिक पातळीवर तुमच्या पदाधिकाऱ्याकडून विरोध होण्याची शक्यता वाटते का ?
नाराज माजी पदाधिकारी – आमच्या विरोधाला पक्षात कुत्रं देखील विचारत नाही.कारण वरिष्ठ पातळीवर काय घडेल ? हे कोणी सांगू शकत नाही.कारण हल्लीचे राजकारण हे बेरजेचे झाले आहे.पण त्यांच्याशी युती झाल्यास महाविकास आघाडीला फटका बसू शकतो.आम्ही जरी अशाप्रकारची युती मान्य केली तरी काँग्रेस ती मान्य करेल,असे वाटत नाही.कारण आ.हितेंद्र ठाकूर यांनी काँग्रेसची पाळेमुळे या तालुक्यातून उखडून टाकली होती.त्यामुळे काँग्रेस अशी आघाडी करेल,असे वाटत नाही.
news27.in – शेवटचा प्रश्न या निवडणुकीत तुमच्या पक्षाला किती जागा जिंकणे शक्य आहे.तसेच बहुजन विकास आघाडी,महाराष्ट्र नवनिर्माण सेना व तुम्ही तिघांनी एकत्रितपणे निवडणुका लढवायचे ठरवले तर भाजपला फटका बसू शकतो का ? तुम्हाला काय वाटते ?
नाराज माजी पदाधिकारी – भाजपला फटका देईल,अशी ताकद एकाही राजकीय पक्षात सध्या तरी दिसत नाही.कारण त्यांच्याकडे पैसा,मनुष्यबळ,खंबीर नेतृत्व अशी तीनही संसाधने मुबलक प्रमाणात आहे.त्याचबरोबर निवडणुकीबाबत त्यांची स्ट्रॅटेजी व नियोजन याविषयी त्यांचा हात कोणीही पकडू शकत नाही.आमच्या पक्षाला किती जागा मिळतील,या प्रश्नाचे उत्तर आजच्या घडीला ब्रह्मदेवालाही सांगता येणार नाही.

