दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
ठाकरे व पवार हे ब्रँड त्यांच्या पुतण्यानीच संपवले…
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे,यांनी दोन दिवसापूर्वी झालेल्या एका मुलाखतीमध्ये केलेली काही वक्तव्ये ही वस्तुस्थितीला धरून नाहीत.आपल्या मुलाखतीमध्ये त्यांनी,राज्यात ठाकरे व पवार हे दोन ब्रँड असून ते संपवण्याचे प्रयत्न होत असल्याचे सांगितले.वास्तविक ठाकरे व पवार हे दोन ब्रँड आहेत,हे मान्य,पण हे दोन्ही ब्रँड संपवण्याचे काम त्यांनी व पवार कुटुंबाच्या वंशाचा दिवा असलेल्या अजित पवार या दोघांनी पद्धतशीरपणे केले.राज यांनी २० वर्षांपूर्वी २७ नोव्हें.२००५ रोजी शिवसेनेला सोडचिट्ठी दिली.त्यावेळी केलेल्या आपल्या घणाघाती भाषणात ” चार कारकुनांच्या कंपूच्या पापात आपल्याला वाटेकरी व्हायचे नाही.शिवसेना प्रमुखच आपले दैवत आहे,मात्र दैवत असलेल्या आमच्या या विठ्ठलाला बडव्यांनी घेरले आहे.अशा बडव्यासोबत आपल्याला काम करायची इच्छा नाही.” म्हंटले होते.त्यामुळे ठाकरे हा ब्रँड कोणी संपवण्याचा प्रयत्न केला,हे स्पष्ट होत आहे.राज्यातील जनतेला राज ठाकरे यांचे हे म्हणणे बिलकुल पटले नाही व त्यांनी सध्या राज व मनसे हे दोन्ही ब्रँड संपवायला घेतले आहेत.ही वस्तुस्थिती लक्षात घेता राज ठाकरे यांच्या वक्तव्याला वास्तवाचा आधार नाही.
ठाकरे ब्रँड सोबत पवार ब्रँड बाबतही त्यांनी मुक्ताफळे उधळली आहेत.शरद पवार यांचा वारस म्हणून ओळखले जाणाऱ्या अजित पवार यांनी दोन वर्षांपूर्वी पवार हा ब्रँड संपवण्याचा विडा उचलला, व त्यामध्ये ते १०० टक्के यशस्वी ठरले. वास्तविक ईडीच्या भितीने त्यांनी पवार ब्रॅंडचे दोन तुकडे केले.भाजपने त्यांच्या अटकेची तयारी केल्यानंतर पुतण्या आपल्या काकाश्रीच्या ऊरावर बसला व त्याने पवार ब्रँडची वाताहत केली.त्यामुळे ठाकरे व पवार हे या ब्रँड असलेल्या कुटुंबाना त्यांच्या पुतण्यानी संपवले ना की राज्याच्या जनतेने….

