दीपक मोहिते,
वसई विरार शहर महानगरपालिकेत यावेळी आमचीच सत्ता – निलेश तेंडुलकर
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांचे पडघम आतापासून वाजू लागले असून भाजप व शिवसेना ( शिंदे गट ) या दोघांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे.या दोन्ही पक्षाच्या नेत्यानी या निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढण्याचे जाहीर केले आहे.पण स्थानिक पातळीवर मात्र वेगळा सूर उमटू लागले आहेत.या निवडणुकीत आम्ही सर्व जागा लढवण्याच्या तयारीत असल्याचे शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष निलेश तेंडुलकर यांनी जाहीर केल्यामुळे राजकीय वातावरण हळूहळू तापू लागले आहे.
यासंदर्भात शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष निलेश तेंडुलकर यांनी news27.in media शी संवाद साधला.त्यांनी या मुलाखतीमध्ये जे काही सांगितले ते आम्ही जसेचे तसे प्रसिद्ध करत आहोत.हा संवाद प्रश्नोत्तराच्या माध्यमातून झाला.
news27.in – सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या चार महिन्यात घेण्यात याव्यात,असे आदेश निवडणूक आयोगाला दिले आहेत.साधारणपणे या निवडणुका कधी होतील ? असे तुम्हाला वाटते.
तेंडुलकर – केंद्रीय निवडणूक आयोग लवकरात लवकर निवडणूक कार्यक्रम जाहीर करेल,अशी शक्यता आहे.साधारणपणे या निवडणुका ऑक्टो.महिन्यात होतील,असा आमचा अंदाज आहे.
news27.in – लोकसभा व विधानसभा निवडणुका तुमच्या पक्षाने लढवल्या नाहीत.जिल्ह्यात लोकसभेची १ व विधानसभेच्या ४ अशा एकूण पाच जागा भाजपला गेल्या.तर पालघर व बोईसर या दोन विधानसभेच्या जागा तुम्हाला मिळाल्या.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये कशी स्थिती असू शकते ?
निलेश तेंडुलकर – वसई- विरारमध्ये गेली अनेक वर्षे आम्ही बहुजन विकास आघाडी विरोधात लढत आलो.त्यावेळी भाजपचे अस्तित्व नाममात्र होते.गेल्या लोकसभा निवडणुकीत आमच्या पक्षाचे राजेंद्र गावित हे खासदार म्हणून निवडून आले होते.पण या निवडणुकीत आम्ही कोणतीही खळखळ न करता भाजपला ही जागा दिली.सिटिंग खासदाराला सहसा डावलण्यात येत नाही,पण आम्ही मनाचा मोठेपणा दाखवला.वसई व नालासोपरा मतदारसंघावरही आम्ही पाणी सोडले.त्यांचे स्नेहा दुबे-पंडित व राजन नाईक हे निवडून आले.प्रत्येक वेळी आम्ही त्याग करायचा हे योग्य आणि मनाला पटणारे देखील नाही. त्यामुळे आम्ही या निवडणुकीत सर्वच्या सर्व जागा लढवण्याच्या तयारीत आहोत.
News 27.in – पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी याविषयी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत या निवडणुका आम्ही महायुतीच्या माध्यमातून लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
निलेश तेंडुलकर – होय,पण मी स्वतः शिंदे साहेबांना जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीची माहिती देणार आहे आणि मला खात्री आहे की यातून शिंदे साहेब मार्ग काढतील.जिल्ह्यात अजित पवार गटाची ताकद नगण्य असल्यामुळे त्यांच्या पक्षाची अडचण येणार नाही.पण भाजपने या निवडणुकीत समजूतदारपणा दाखवायला हवा,असे मला वाटते.
News 27.in – वसई विरार शहर मनपाच्या एकूण ११५ जागा आहेत,त्या लढवण्यासाठी तुमच्याकडे पुरेसे उमेदवार आहेत का ?
निलेश तेंडुलकर – आमच्याकडे सुमारे ४५० उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत.प्रत्येक जागेसाठी सरासरी तीन उमेदवार,असे एकूण ४५० उमेदवार आम्ही तयार ठेवले आहेत.तसेच या निवडणुकीत अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी आम्ही स्ट्रॅटेजी देखील आखली आहे.प्रत्येक वेळी आम्ही अन्याय सहन करणार नाही.
News 27.in – भाजपचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही ठिकाणी आम्ही मैत्रीपूर्ण लढती लढू,असे स्पष्ट केले आहे.त्यांनी दिलेले हे संकेत तुम्हाला मान्य आहेत का ?
निलेश तेंडुलकर – जर आमच्या कार्यकर्त्यांची कूचंबणा होणार असेल तर फडणवीस यांनी दिलेला प्रस्ताव आमचे वरिष्ठ नेते मान्य करतील,असे वाटते.काही ठिकाणी आमचे एकमेकांशी दोन हात झाले तर दोघांनाही आपापल्या ताकदीचा अंदाज येईल व भविष्यासाठी ते फायदेशीर ठरेल.
News 27.in – या निवडणुकीत तुम्ही व भाजप एकूण किती जागा जिंकू शकाल ?
निलेश तेंडुलकर – या महानगरपालिकेत यावेळी सत्ता आमचीच असेल, आमच्यामध्ये समजा मैत्रीपूर्ण लढत झाली तरी आम्ही ८० ते ९० % जागा नक्कीच जिंकू शकू.
News 27.in – समजा भाजप व तुमच्यामध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली,तर त्याचा फायदा बहुजन विकास आघाडीला होणार नाही का ?
निलेश तेंडुलकर – बिलकुल नाही,कारण बहुजन विकास आघाडी हा विधानसभा निवडणुकीतील पराभवाने पार खचून गेला आहे.त्या पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अवसान पार गळाले आहे. त्यामुळे या निवडणुकीत ते फारसे काही करू शकतील, असे मला वाटत नाही.

