जव्हार प्रतिनिधी,
धानोशी-जव्हार येथे खरीपपूर्व शेतकरी शिबिर संपन्न,
जव्हार तालुक्यातील ग्रामपंचायत धनोशी येथे खरीपपूर्व शेतकरी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिरात ५० हून अधिक शेतकरी सहभागी झाले होते.
पाच दिवसीय शिबिरात जेएसडब्ल्यू फाउंडेशन फेलोशिप कार्यक्रमांतर्गत आणि तालुका कृषी विभागाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते.शिबिराचा उद्देश आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना आवश्यक माहिती,मार्गदर्शन आणि शाश्वत शेतीसाठी प्रशिक्षण देणे हा होता.या शिबिराचे उद्घाटन तालुका कृषी अधिकारी जयराम आढळ यांच्या हस्ते झाले.त्यांनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांना उत्पादनवाढ, सुधारित शेतीपद्धती, तसेच विविध शासकीय योजनांची माहिती दिली.प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, प्रधानमंत्री फसल विमा योजना अशा योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा,असे आवाहन त्यांनी केले.कृषी विभागाच्या एटीएमए अंतर्गत कार्यरत ब्लॉक तांत्रिक व्यवस्थापक सुनील महाला यांनी किसान क्रेडिट कार्ड,बियाणे प्रक्रिया, मूल्यवर्धन,एफपीओ स्थापन, आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती दिली.जेएसडब्ल्यू फाउंडेशन फेलो विवेक शहारे यांनी सांगितले की, “ कृषी तंत्रज्ञान,माती व्यवस्थापन, पीक विविधीकरण व कीड नियंत्रण यासारख्या विषयांवर आधारित सत्रांद्वारे शेतकऱ्यांच्या ज्ञानात वाढ करणे हे या शिबिराचे प्रमुख उद्दिष्ट होते.
शिबिरात सहभागी शेतकऱ्यांना माहितीपूर्ण सल्ला,बियाणे व खते यांच्या उपलब्धतेबाबत माहिती, अनुदान,कर्ज व विमा पर्यायांचे मार्गदर्शन करण्यात आले.हे शिबिर केवळ प्रशिक्षणा पुरते मर्यादित नसून,शेतकऱ्यांना विविध योजनांशी जोडण्याचा आणि सामुदायिक संवाद वाढवण्याचा प्रयत्नही आहे.ग्रामपंचायत धानोशीचे सरपंच विष्णू दादा पवार यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल मार्गदर्शक व आयोजकांचे आभार मानले व गावातील अधिकाधिक शेतकऱ्यांना कृषी विकास योजनांशी जोडण्याची आपली वचनबद्धता व्यक्त केली. शिबिरादरम्यान त्यांना जेएसडब्ल्यू फाउंडेशनकडून विशेष सन्मानपत्र देण्यात आली.या उपक्रमात जेएसडब्ल्यू फाउंडेशन फेलो अभिषेक सागर यांचे विशेष सहकार्य लाभले.तसेच एसबीआय फाउंडेशन फेलो प्रियाताई,ग्रामपंचायतचे उपसरपंच,सदस्य व अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिबिराचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात झाला.

