वसंत भोईर,वाडा
सरकारच्या फसव्या घोषणेमुळे खरीप हंगामाचे शेतकरी अडचणीत,
सध्या पीक कर्जासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.काही शेतकऱ्यांनी ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून खरीप हंगामातील पीक कर्जाची उचलही केली आहे. तर काहींची कर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.परंतु सत्ताधाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार कर्जमाफी होईल,अशी भाबडी आशा असलेल्या शेतकऱ्यांचा पूर्णपणे भ्रमनिरास झाला आहे.त्याचा परिणाम यंदा पीक कर्जाच्या नूतनीकरणावर होण्याची शक्यता आहे.
ठाणे पालघर जिल्ह्यात खरीप हंगामात सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात येत असते.काहींना तांत्रिक अडचणीमुळे पीक कर्ज वेळेत मिळत नाही.त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्याप्रमाणात कोंडी होत आहे.शेतात पेरणी केल्यानंतर कधी पाऊस दगा देतो,तर कधी अतिवृष्टीचा तडाखा बसतो.त्यामुळे शेतकऱ्यांना अनेकदा नुकसानीचा सामना करावा लागतो.अशावेळी पीक कर्जही थकीत होत असते.परिणामी थकीत शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यात अडचणी येतात व कर्जासाठी त्यांचे पाय सावकाराच्या घराकडे वळतात.
विधानसभा निवडणुकीदरम्यान सत्ताधाऱ्यांनी कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु,ही आशा आता फोल ठरली आहे.अनेकांनी कर्ज न भरल्यामुळे नवे पीक कर्ज मिळण्यास सध्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारच्या घोषणेनुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा होती.त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड केली नाही.त्याचा परिणाम म्हणून जिल्ह्यातील शेती संस्था व ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या थकबाकीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.यंदा बँकेच्या शेती कर्ज थकबाकीत गेल्या वर्षीच्या तुलनेत ३६ कोटी ४६ लाखानी वाढ झाली आहे.
यंदा खरीप हंगामासाठी ७ हजार ३३१ नवीन शेतकऱ्यांनी कर्ज उचलले आहे.१४ मे पर्यंत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ५५ कोटी ०४ लाखांचे पीक कर्ज वाटप केले आहे.
गेल्या वर्षी खरीप हंगामासाठी २६ हजार ५७२ सभासदांनी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अल्प मुदत कर्जाची परतफेड मुदतीत केली.त्यामुळे या हंगामात सभासद नवीन कर्ज घेण्यास पात्र झाले आहेत.
ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेती संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज वाटप करत आहे.३९९ शेती संस्थापैकी १०३संस्था एनपीएच्या वर्गवारीत आहेत. संस्थांकडे ठाणे जिल्हा सहकारी बँकेची ११३ कोटी ९१ लाख रु.एनपीए आहे. बँकेच्या एकूण एनडीएच्या तुलनेत एनपीएचे प्रमाण ३०.५२ % इतके झाले आहे.गेल्या वर्षाच्या तुलनेत शेती कर्जाच्या एनपीएमध्ये ८ कोटी ३७ लाख रु.ने वाढ झाली आहे.
Trending
- बलाढ्य अमेरिकेला अखेर गुडघे टेकावे लागले……
- इस्त्रायलच्या हेकेखोरपणामुळे युद्धविराम दृष्टिक्षेपात नाही…
- पक्षांतरबंदी कायदा ; कायद्यातील परिच्छेद ४ चा पुनर्विचार होणे गरजेचे….
- युद्धविराम ; जगाचा जीव भांड्यात पडला..
- शिक्षक घरी येणार ; विद्यार्थ्यांना ऍडमिशन करून देणार, सरकारचे डोकं फिरलंय
- पुरोगामी राज्य अशी ओळख असलेले राज्य आता वेगळ्या वळणावर,
- अखेर अमेरिका गुडघ्यावर आली, ट्रम्पवर अमेरिकन जनतेचा वाढता दबाव,
- धोकादायक रेल्वेप्रवास ; कायमस्वरूपी तोडगा हवा,

