दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
पालघर जिल्ह्यात महायुतीतील शिवसेना – भाजपच्या वेगवेगळ्या चुली,
काल पालघर जिल्ह्यात भाजप व शिंदे गटातर्फे दोन वेगवेगळ्या तिरंगा रॅली निघाल्या.भाजपच्या रॅलीचे नेतृत्व पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडे होते.त्यामुळे शिंदे गटाने आपली वेगळी चूल मांडली.महायुतीमधील दोन पक्ष समोरासमोर उभे ठाकल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी गणेश नाईक यांची वर्णी लागल्यापासून जिल्ह्याच्या राजकारणात भाजप- शिंदे गटात अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे.एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी उभयपक्ष सोडत. नाहीत.गणेश नाईक यांच्या कार्यकाळात आपल्या गटाला न्याय मिळू शकणार नाही,हे लक्षात घेऊन एकनाथ शिंदे यांनी आपले विश्वासू सहकारी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची जिल्ह्याच्या संपर्कमंत्रीपदी वर्णी लावली.त्यानी पदाची सूत्रे. हाती घेताच गणेश नाईक यांना आव्हान देण्यास सुरुवात केली.नाईक यांच्या जनता दरबाराला अपशकुन करण्यासाठी सरनाईक यांनी जिल्ह्यात ” ” लोकदरबार,” चे आयोजन करण्यास सुरुवात केली आहे.महायुती सरकारमधील दोन मंत्री वेगवेगळे दरबार भरवतात,हे पाहून दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते देखील संभ्रमावस्थेत सापडले आहेत.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गणेश नाईक या दोघांचे नाते हे विळ्या भोपळ्याचे असे असून गणेश नाईक यांनी शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांची लोकसभा निवडणुकीत उमेदवारी कापण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले होते.पण अमित शहा यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केल्यामुळे नाईक यांना आपल्या तलवारी म्यान कराव्या लागल्या होत्या.नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या राजकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वाढते वर्चस्व लक्षात घेऊन शिंदे यांचे पंख कापण्यास सुरुवात केली.” शत्रूचा शत्रू,तो आपला मित्र,” या न्यायाने भाजपने गणेश नाईक यांचे प्यादे पुढे सरकवले.गणेश नाईक यांनीही पालघर जिल्ह्यात विविध कार्यक्रम राबवण्यास सुरुवात केली.त्यांनी सुरू केलेल्या ” जनता दरबार,” या उपक्रमात शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्त्याना फारसे प्राधान्य देण्यात आले नाही,त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रताप सरनाईक याना मैदानात उतरवले.त्यांना पक्षाचे संपर्कमंत्री म्हणून मैदानात उतरवले.त्यांच्या ” लोकदरबार,” उपक्रमाला पालघरवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.पालघर जिल्ह्यात एकनाथ शिंदे गटाचे निर्विवाद वर्चस्व आहे,त्याला खिंडार पाडण्यासाठी फडणवीस यांनी खेळलेल्या खेळीला शिंदे गटाने चांगलाच शह दिला आहे.
काल दोघांनी वेगवेगळ्या चुली मांडत तिरंगा रॅली काढल्यामुळे या दोन्ही पक्षात निर्माण झालेली दरी अधिक रुंदावत चालली असल्याचे स्पष्ट होत आहे.

