जव्हार प्रतिनिधी,
जव्हार – तुळजापूर येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा संपन्न,
जव्हार तालुक्यातील तुळजापूर येथे ग्रामस्थ मंडळातर्फे गावातील एकूण २१ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोपाळ बोरसे सर होते,प्रमुख पाहुणे म्हणून मातोश्री हॉस्पिटल,जव्हार येथील डॉ. प्रविण भोये,डॉ.धावजी धूम, डॉ.धनंजय धूम,तसेच जीएसटी विभागातील अधिकारी सखाराम पाचकूडवा,अधीक्षक आनंद टोपले,एमएसईबी चे रमेश गवळी,ट्रॅफिक पोलीस अधिकारी नितीन बोरसे, तंटामुक्ती अध्यक्ष हनुमंत बोरसे,ग्रामपंचायत सदस्या लता गवळी आणि बसचालक रमेश तुंबडा इ. मान्यवर उपस्थित होते.
डॉ.प्रविण भोये यांनी विद्यार्थ्यांना जीवनातील संघर्ष आणि शिक्षणाचे महत्त्व याविषयी आपले अनुभव सांगत व्यसनमुक्त जीवनाचे आणि उच्च शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.त्यांनी यावेळी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व पुस्तके उपलब्ध करून देण्याचे वचन दिले.
अध्यक्ष गोपाळ बोरसे यांनी आपण शिक्षक कसे झालो, याबाबत आपला प्रवास सांगत मुलांना प्रेरित केले.त्यांच्या मुलांनी एक सर्जन आणि एक इंजिनिअर म्हणून यश मिळवल्याचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला.डॉ. धावजी धूम आणि सखाराम पाचकूडवा यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पाचकूडवा यांनी २१ विद्यार्थ्यांना स्कूल बॅगा भेटी दिल्या आणि पुढील ऍडमिशन साठी लागणारे सर्व झेरॉक्स/कॉपी मोफत देण्याबाबत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाला हरेश बोरसे हे वेळेअभावी उपस्थित राहू शकले नाहीत,मात्र त्यांनी व्हॉट्सअॅपद्वारे विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.नोकरी संदर्भात सहकार्याचे आश्वासन दिले.विद्यार्थ्यांचा सत्कार शाल,पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन पालकांच्या उपस्थितीत करण्यात आला.दहावीचे फॉर्म क्र.१७ भरून शिक्षण घेतलेल्या आशावर्कर वनिता देवराम कामडी व कल्पना रमेश गवळी या महिलांनी यश संपादन करून इतरांसमोर आदर्श निर्माण केला.तसेच नितेश कान्हात याने होमगार्ड परीक्षेत यश मिळवून गृहखात्यात निवड झाल्याबद्दल त्याचाही सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश बोरसे यांनी,तर आभारप्रदर्शन भरत कामडी यांनी केले.कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन राजेश भोये,विवेक बोरसे,देवराम कामडी,दशरथ तुंबडा व भरत कामडी यांनी केले.

