वसंत भोईर,वाडा
वाडा पं.स.च्या तांत्रिक सहा.ला लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले,
वाडा पंचायत समिती रोजगार हमी योजनेचे तांत्रिक सहा.सुशील कटारे याला ५ लाखाचा निधी मंजूर करण्यासाठी ५ हजाराची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.या प्रकाराने पंचायत समितीमधील भ्रष्ट कारभार चव्हाटय़ावर आला आहे.
अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,यातील तक्रारदार यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत विहीरीकरिता ५ लाखांचा निधी मंजूर करण्यासाठी पंचायत समिती वाडा यांच्याकडे अर्ज केला होता.ही विहीर मंजूर करण्यासाठी तांत्रिक सहा.व वरिष्ठांसाठी १५ हजार रू.ची मागणी केली होती.तक्रारदार यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली होती.त्यानुसार काल तक्रारदार यांना पंचासोबत पडताळणीसाठी पाठवले असता,स्वत:साठी ५ हजार व वरिष्ठासाठी १५ हजार रू.लाचेची मागणी केली.परंतू तक्रारदार यांच्याकडे ५ हजार रू. असल्यामुळे लोकसेवक कटारे याने सदरची रक्कम घेऊन येण्यास सांगितले.त्यानंतर ५ हजार रू.ची लाच कटारे यांना स्विकारताना त्याना रंगेहाथ पकडले.कटारे याचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला असून पुढील तपास करण्यात येत आहे.
ही कारवाई ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक संतोष अंबिके यांच्या नेतृत्वाखाली पोलीस नाईक अभिजित पवार,पोलीस हवालदार सुमडा,योगेश धारणे याच्या पथकाने केली.
दरम्यान,वाडा पंचायत समितीत टक्केवारी घेतल्याशिवाय कामच होत नाही.अनेक फाईली वरिष्ठाच्या टेबलावर महिनोंमहिने पडून असतात.पैशाशिवाय कामच होत नसल्याचे नागरिकाचे म्हणणं आहे.पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वैभव शिंदे हे कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यास अपयशी ठरले असून महिनो महिने फाईल का पडून आहेत,याची खातरजमा केल्यास अनेक गैरप्रकार उघडकीस येतील,अशी चर्चा सर्वत्र होत आहे.

