वसंत भोईर,वाडा
बैलजोडीचा भाव लाखांत ;
चारा महागला,ट्रॅक्टर परवडला,
चारा टंचाईमुळे गुरांच्या बाजारात दर आठवड्याला विक्रीसाठी आलेल्या जनावरांची संख्या वाढत आहे. दुसरीकडे,बैलजोडीची किंमत देखील लाखात गेल्यामुळे बैलजोडी सांभाळणे,सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे.

दिवसेंदिवस शेती करणे आता कठीण होत आहे.खते, बियाणे व औषधे यांचा खर्च गगनाला भिडला असतांना शेतीवर नफा मिळणे,कठीण झाले आहे.सालगड्याचे भाव एका वर्षासाठी दीड लाखांच्या घरात पोहोचले आहेत.एवढे पैसे मोजूनही जनावरांचे संगोपन करायला मजूर मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.यातच आता गेल्या काही वर्षात बैलांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. सर्वसाधारण बैलजोडी दीड ते दीड लाख लाखाच्या घरात पोहोचली आहे.
वाढत्या लोकसंख्येमुळे शेतीची विभागणी झाली असुन बहुतांश शेतकरी अल्पभूधारक झाले आहेत. याशिवाय तालुक्यात चारा टंचाई असल्याने चाऱ्याच्या दराने डिझेलची बरोबरी साधली आहे.
बैलजोडी सांभाळणे दिवसेंदिवस कठीण होत आहे.शेतीपेक्षा बैलाचा वापर शर्यतीसाठी मोठ्या प्रमाणात केला जात आहे.लाखो रु.खर्च करून एक बैल घाट माथ्यावरून खरेदी केला जात आहे.
शर्यतीच्या आवडीमुळे बैलगाडा मालकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बैलाच्या चाऱ्यावर मोठा खर्च केला जात आहे.
बैलांच्या किमती भडकल्याने व संगोपन परवडत नसल्याने शेतकऱ्यांचा ओढा ट्रॅक्टर खरेदीकडे वाढला आहे.यातच शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व यंत्र खरेदीसाठी शासनाच्या वतीने अनुदान दिले जात आहे. दुभत्या जनावरांचे संगोपन करणे फार अवघड झाले आहे. आणि दुधाच्या दरातही कमालीची तफावत आहे.पण शेणखत व दूध मिळत असल्याने दुभत्या जनावरांची मागणी मात्र वाढू लागली आहे.

