नवीन पाटील,सफाळे
सफाळ्यात बोगस आयएएस अधिकाऱ्याकडून कोट्यवधींचा जमीन घोटाळा,
डेप्युटी कलेक्टर असल्याचा बनाव करीत खोटे दस्तावेज बनवून कोट्यावधींच्या जमिनींचा घोटाळा करणाऱ्या प्रतिक मोहन पाटील ( रा. मधुबन सोसायटी,सफाळे ) याला सफाळे पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,२०२२ मध्ये राज्यसेवा परीक्षा देवून त्यात उत्तीर्ण होऊन डेप्युटी कलेक्टर झाल्याचा बनाव रचला.
प्रतिक पाटील हा सफाळे परिसरात राहत होता,सफाळे पोलिस स्टेशन हद्दीतील कर्दळपाडा भागात पालघर येथील जयंत विष्णू दांडेकर यांची १५ एकर आणि आशालता दत्तात्रय ताम्हणकर या मयत महिलेची साडेपाच गुंठे मालकीची जमीन आहे. या दोन्ही जमिनींसाठी बनावट आधारकार्ड आणि पॅनकार्ड यांच्या साहाय्याने प्रतीक पाटील यांनी खोटे दस्तावेज बनवले व ११ एप्रिल २०२५ रोजी तपासणी करण्यासाठी सफाळे येथील मंडळ अधिकारी कार्यालयात पाठवले.तसेच आपण आयएएस अधिकारी असून कलेक्टर गोविंद बोडके यांच्या मुलाचे बॅचमेट असल्याचे त्याने मंडळ अधिकारी तेजल पाटील यांना सांगितले.
तलाठी अजित घरत यांनी दस्ताऐवजाची दफ्तरी नोंद केल्यावर काहीच दिवसांनी तेजल पाटील यांना कागदपत्रे तपासतांना जमिनीसंदर्भातील खरेदी दस्तवेज व भाडेपट्टा करारात खोट्या सह्या व बनावट आधारकार्डाचा वापर केला असल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देवून सफाळे पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार सफाळे पोलिस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक यांनी प्रतीक पाटील याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले.पोलिसांनी प्रतीक पाटील यास ९ मे २०२५ रोजी पालघर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याच्याविरोधात अधिकाधिक पुरावे गोळा करण्याच्या सूचना दिल्या. याप्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी करत आहेत.

