दीपक मोहिते,
” हल्लाबोल, ”
राज्याच्या राजकारणाची अधोगती सुरू,
” युद्ध व प्रेमात सारं काही क्षम्य असतं,” असं म्हंटल जातं ते खरंच आहे.पण महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे काही घडत आहे,त्याचे ” राजकारणाची अधोगती,” असे वर्णन केल्यास ते चुकीचे ठरू नये.दीड दशकापूर्वी दोन ठाकरे बंधू एकमेकांच्या उरावर बसले होते,तर दोन वर्षांपूर्वी काका-पुतण्यामध्ये जोरदार सत्तासंघर्ष निर्माण होऊन पक्षाची दोन शकले झाली. स्वार्थी राजकारणाचा हा परिपाक होता.पुतण्याने पक्ष, चिन्ह व आमदार पळवल्याचे सांगत काकाश्रीनी राज्यभरात आपला ऊर बडवला.आज तेच काका/पुतण्या व दोन ठाकरे बंधू ” आम्ही एकत्र आलो तर आश्चर्य वाटता कामा नये,” असा ढोल पिटण्यात धन्यता मानत
आहेत.गेल्या ६६ वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणाची कधीच एवढी अधोगती झाल्याचे पाहायला मिळाले नव्हते,ते यानिमित्ताने अनुभवायला मिळाले.

दोन वर्षांपूर्वी फुटलेली दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा आता सुरु झाली आहे.शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.शरद पवार,हे राज्याचे फार मोठे नेते आहेत.त्यांच्या दीर्घकालीन राजकारणाच्या अनुभवाचा फायदा राज्य सरकारला होईल,असे प्रताप सरनाईक म्हणाले.शरद पवार आता नवीन नेतृत्वाच्या हाती सत्ता देऊ पाहत आहेत.त्यांच्या या निर्णयाचे स्वागत आहे,अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जुलै २०२३ मध्ये खा. शरद पवारांच्या भूमिकेशी फारकत घेऊन भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ओरिजनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा ? यावरुन दोन्ही नेते न्यायालयात गेले आहेत.लोकसभेची आणि विधानसभेची निवडणूक देखील दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या विरोधात लढवली.पक्ष फुटल्यानंतरही दोन्ही गटाच्या नेत्यांच्या एकमेकांशी गाठी भेटी होत होत्या.विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार अनेक व्यासपीठावर एकत्र आल्याचं पाहायला मिळालं होतं. अशातच शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.
शरद पवारांच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात भूवया उंचावल्या आहेत.भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आश्चर्य वाटणार नाही,असं म्हणत शरद पवार यांनी गुगली टाकली आहे.दरम्यान एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार म्हणाले,संसदेत विरोधी बाकांवर बसावं की नाही ? हा निर्णय सुप्रियानं घ्यावा.सुप्रिया सुळेंचं काय ? या प्रश्नावर शरद पवारांनी हे उत्तर दिलं होतं. पक्षात दोन प्रवाह आहेत, एकाला वाटते अजितसोबत जावे.दुसरा प्रवाह भाजपपासून दूर राहावे,या मताचा आहे,असंही शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं. भविष्यात एकत्र यायचं की नाही ? हे राष्ट्रवादीच्या नव्या पिढीतील नेतृत्वाने ठरवावे. मी आता त्या निर्णय प्रक्रियेतून काहीसा बाजूला झालोय.आमची मंडळी विविध पक्षात विभागली असली तरी विचाराने एकत्र आहेत.आमचे दिल्लीतील खासदारही एकाच विचाराने बांधले गेले आहेत. होय,राज्यातील आमच्या काही आमदारांना असं वाटतं मतदारसंघातील विकासकामे करून घेण्यासाठी अजित पवारांसोबत गेलं पाहिजे.पण याबाबतचा निर्णय हा मी घेणार नाही.त्यांनी तो निर्णय एकत्र बसून घ्यावा.एकत्र येण्यासंदर्भात सुप्रिया आणि अजितने बसून ठरवावं.पक्ष उभा करताना आज बाजूला गेलेलं सगळे एकत्र होते. त्यांच्या सगळ्यांची विचारधारा एकचं आहे.त्यामुळे भविष्यात जर हे सगळे एकत्र आले तर मला आश्चर्य वाटणार नाही. माझे सगळे खासदार एकाच मताचे आहेत.
शरद पवार,अजित पवार,राज ठाकरे व उद्धव ठाकरे,या चौघापेक्षा एकनाथ शिंदे यांचे वागणे,हे राजकीयदृष्ट्या प्रगल्भतेचे मानले जाते.आज एकनाथ शिंदे गट राज्याच्या राजकारणात काहीसा बाजूला फेकला गेला असला तरी भविष्यात त्यांचाच गट भाजपासाठी तारणहार ठरू शकतो.भाजपपासून दुरी राखत आपण फार काळ राजकारणात टिकू शकणार नाही.आपली कन्या खा. सुप्रिया सुळे हीला कधीच संधी मिळणार नाही.हे लक्षात घेऊन शरद पवार आता अजित पवार यांचा खांदा वापरू पाहत आहेत.एका ग्रीक तत्वज्ञाने ” politics is not a profession,but it’s prostitution,” असे म्हंटलं होतं,ते यानिमित्ताने आता खरं ठरु पाहत आहे.

