नवीन पाटील,सफाळे
विनयभंग करणा-या आरोपीस एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा,
पालघर जिल्ह्यातील सफाळे पोलिस ठाणे हद्दीतील केळवा रोड धोंदलपाडा भागात एका महिलेची छेड काढून तिचा विनयभंग करणाऱ्या ओमकार संतोष जाधव रा. पिलाजीनगर,केळवा रोड पूर्व याला पालघर न्यायालयाने एक वर्षाची कारावास आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,३० मार्च २०२५ रोजी रात्री ८.३० च्या सुमारास पिडीत फिर्यादी या धोंदलपाडा,केळवे रोड पूर्व येथे टिकलीला स्टोन लावण्याचा कच्चा माल घेवून जात असतांना आरोपी ओमकार संतोष जाधव या तरुणाने पिडीत महिलेच्या मानेला पकडले.त्यावेळी त्या महिलेने त्यास जोरात झटका देवून स्वतः ला सोडवून घेवून पळण्याचा प्रयत्न केला. आरोपीने पिडीत महिलेची साडी पाठीमागून पकडून तिचा विनयभंग केला होता.याप्रकरणी पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुन सफाळा पोलीस ठाण्यात ३१ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून सफाळे पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकाऱ्यानी पुरावे गोळा करुन प्रथमवर्ग न्यायंदडाधिकारी पालघर येथे दोषारोपपत्र दाखल केले होते. पालघर येथील प्रथमवर्ग न्यायंदडाधिकारी
न्यायाधीश के.जी.सावंत यांनी २९ एप्रिल रोजी आरोपीस १ वर्ष कारावास व ५ हजार रु. दंडाची शिक्षा ठोठावली आहे.याप्रकरणी सफाळा पोलीस ठाण्याचे अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

