संदीप जाधव,बोईसर
भाजप बोईसर मंडळ निवडणुकीवरून वाद ; अनेक कार्यकर्ते नाराज,
भाजपच्या बोईसर मंडळाच्या निवडणूक प्रक्रियेवर आरोप होत असून,व्यापारी मोर्चा व वाहतूक आघाडीतील प्रमुख कार्यकर्त्यांना मतदान प्रक्रियेतून जाणूनबुजून दूर ठेवण्यात आल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीची प्रक्रिया तातडीने स्थगित करण्याची मागणी करण्यात येत आहे.याप्रकरणी कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत आहेत.
भाजपच्या बोईसर मंडळ निवडणुकीत पारदर्शकतेचा अभाव होता.व्यापारी मोर्चा आणि वाहतूक आघाडीचे सक्रिय पदाधिकारी असूनही दुर्गेश सोलंकी आणि अहमद खान यांना मतदान प्रक्रियेपासून दूर ठेवण्यात आले.निवडणूक प्रक्रियेची कुठलीही पूर्वकल्पना न देता एकतर्फी पद्धतीने प्रक्रिया राबवण्यात आल्यामुळे कार्यकर्त्यामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
या संदर्भात भाजप नेते आशिष संखे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, ” निवडणूक पूर्णपणे एकतर्फी पार पडली असून शेकडो कार्यकर्ते नाराज झाले असुन ते आता पक्षत्यागाच्या तयारीत आहेत.पारदर्शकतेचा पूर्ण अभाव असून आम्हाला मतदान करण्याची संधीच देण्यात आली नाही.” असे त्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान,या प्रकरणी भाजप नेते अशोक वडे यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, ” आपल्या विभागाचे प्रभारी जगदीश राजपूत यांच्याशी मंडळ अध्यक्ष निवडीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.व्यापारी मोर्चा व वाहतूक आघाडीच्या कार्यकर्त्यांना मतदान प्रक्रियेपासून दूर ठेवण्यात आले असल्याचे लक्षात आले आहे.त्यामुळे सद्यस्थितीत मंडळ नियुक्ती प्रक्रिया स्थगित करण्यात याव्यात,अशा सूचना देण्यात आल्या आहेत.”
ते पुढे म्हणाले की, “ या प्रकरणासंदर्भात आमची प्रदेशाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून,दोन दिवसांत योग्य निर्णय होईल,असे आश्वासन देण्यात आले आहे.”
या प्रकारामुळे बोईसर भाजपमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा समोर आली असून,स्थानिक पातळीवर नेतृत्व बदलाच्या चर्चांनाही उधाण आले आहे.आता पुढील दोन दिवसांत प्रदेश कार्यालयातून काय निर्णय येतो,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान,या प्रकरणी नवनिर्वाचित बोईसर मंडळ अधिकारी महेंद्र भोणे यांची काय प्रतिक्रिया येते,हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरणार आहे.हे मात्र स्पष्ट आहे की, बोईसर भाजपमध्ये आता दोन गट पडले आहेत.

