दीपक मोहिते,
” राज-का-रण,”
विधानसभा निवडणुकीनंतर भाजप वगळता सर्वच पक्ष पार ढेपाळले,
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता बेमुदत लांबणीवर पडल्या असून याप्रकरणी होणारी सुनावणी निदान चार महिने तरी होणे शक्य नाही,अशी चर्चा सर्वत्र होत आहे.त्यामुळे या निवडणुका कधी होतील,हे सांगणे सध्या तरी कठीण आहे.
निवडणुका लवकर होणार नाहीत,हे निश्चित झाल्यानंतर भाजप व शिवसेना ( उबाठा ) या दोघांनी पक्षबांधणीवर भर दिल्याचे स्पष्ट होत आहे.भाजपने राज्यात ९६३ मंडळ अध्यक्षांच्या नव्याने नियुक्त्या केल्या आहेत.लवकरच पक्षाच्या जिल्ह्याध्यक्षांच्या निवडणुका होणार आहेत.उद्धव यांच्या शिवसेनेने देखील दोन महिन्यांपूर्वी बरेच संघटनात्मक बदल केले होते.विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत जबर फटका बसल्यामुळे हे संघटनात्मक बदल करण्यात आले.पण त्यांचा पक्ष पराभवाच्या धक्क्यातून अद्याप सावरलेला नाही.अनेक जिल्ह्यातील पदाधिकारी शिंदे गटाच्या वळचणीला गेल्यामुळे ग्रामीण भागात पक्ष अत्यंत कमकुवत झाला आहे.आजच्या घडीला महानगरपालिका,नगरपरिषद,नगरपंचायत,जिल्हा परिषद,पंचायत समित्यांच्या निवडणुका लढवण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे उमेदवार नाहीत.भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचीही तशीच अवस्था असल्याचे पाहायला मिळत आहे.दुसरीकडे पालघर जिल्ह्याच्या राजकारणात एकेकाळी दबदबा असलेली बहुजन विकास आघाडी देखील विधानसभा निवडणुकीतील पराभवाने अद्याप सावरलेली नाही.पराभवानंतर पक्षाचे वरिष्ठ नेते पक्षबांधणीवर भर देतील व पक्षाला उभारी देतील,असा अंदाज होता.पण तसे काही घडले नाही.पराभवामुळे पक्षात आलेली मरगळ झटकून टाकण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक होते,पण तसे काही घडल्याचे देखील पाहायला मिळाले नाही.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडे पुरेसे मनुष्यबळ व निधी नसल्यामुळे त्यांना या निवडणुका लढवणे शक्य होणार नाही.जिल्ह्यात काँग्रेसकडे हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच पदाधिकारी व कार्यकर्ते असल्यामुळे त्यांना आजवर साध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका पूर्ण ताकदीने कधीच लढवता आल्या नाहीत.एकनाथ शिंदे गटाची ताकद पालघर व बोईसर वगळता इतर तालुक्यात नगण्य असल्यामुळे त्यांनाही विक्रमगड,डहाणू,वाडा,
वसई व नालासोपारा या पाच मतदारसंघात निवडणुका लढवणे,तसे कठीणच आहे.दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस असून नसल्यासारख्या आहेत.या दोन्ही पक्षाकडे प्रभावी नेतृत्व नाही,तसेच हे दोन्ही पक्ष कार्यकर्त्या अभावी अत्यंत कुपोषित असल्यामुळे त्यांना यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीच प्रभावीपणे लढवता आल्या नाहीत.आगामी निवडणुकामध्येही त्यांची पाटी कोरी राहण्याची शक्यता आहे.भाजप वगळता पालघर जिल्ह्यातील सर्वच पक्ष सध्या डळमळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे भाजप वगळता सर्वच पक्षाचे नेतेमंडळी पार खचून गेले आहेत,त्याचा परिणाम कार्यकर्त्यांच्या मनोबलावर झाला आहे.
दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षी होतील,असा अंदाज व्यक्त होत आहे.महायुती सरकारला या निवडणुका आणखी लांबणीवर पडल्या तर हव्याच आहेत.कारण सध्याच्या प्रशासकीय राजवटीच्या माध्यमातून त्यांचा एककल्ली कारभार सुरूच आहे.

