दीपक मोहिते,
” लेखाजोगा,”
राज – उद्धव एकत्र येणे ; हे केवळ क्षणिक वादळ,
राज व उद्धव हे दोघे ठाकरे बंधू एकत्र येणार की नाही,हे लवकरच पाहायला मिळणार आहे.ते एकत्र आले तर महाराष्ट्राचा काय व कसा फायदा होणार आणि नाही आले तर काय नुकसान होणार ? याविषयी लेखाजोगा मांडणे आवश्यक ठरते.त्याच्या एकत्र येण्याने राज्याच्या राजकारणावर किती परिणाम होईल,सांगणे कठीण असले तरी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला काही प्रमाणात बळ मिळू शकेल.हे दोघे एकत्र जरी आले तरी या दोघाना सत्तेच्या राजकारणात शिरकाव करणे,शक्य होणार नाही.कारण राज ठाकरे यांच्या मनसेला जनाधार नाही.त्यामुळे निवडणूक जिंकणे,हे या दोन भावांच्या सध्या तरी आवाक्याबाहेरची गोष्ट आहे.
त्यामुळे भाजप या घडामोडीबाबत अगदी निवांत आहे.राज्याच्या राजकीय समीकरणावर काहीही परिणाम होणार नाही,हे ते जाणून आहेत.उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही क्षीण झाली आहे,तर राज यांच्या मनसेचे राजकारण सर्वसामान्य जनतेच्या पचनी पडत नाही.त्यामुळे त्यांनी या घडामोडीची फारशी दखल घेतलेली नाही.समजा हे दोघे भाऊ एकत्र आले तरी ते फार काळ एका छताखाली राहू शकणार नाहीत.कारण दुखावलेली मने पुन्हा जुळत नसतात,आणि राजकारणात तर ते कधीच शक्य होत नसते. बाळासाहेब हयात असते तर कदाचित ते शक्य झाले असते.आता दुसरी बाजू पाहूया,हे दोघे जर एकत्र आले नाही तर काय होईल ? आज ज्या पद्धतीचे राजकारण सुरू आहे,ते तसेच पुढे चालत राहील.दोघांचेही हात दगडाखाली आहेत.त्यांच्यावर ईडीची तलवार कायमची लटकती आहे.एकवेळ उद्धव ठाकरे ईडीला घाबरणार नाहीत,पण राज यांचे तसे नाही,ते ईडीच्या भितीने परतीचा प्रवास पुन्हा सुरू करतील.सध्या हे जे वादळ उठले आहे,ते क्षणिक आहे.ईडीने डोळे वटारले की पुन्हा “ऑल इज वेल,” झाल्याचे आपल्याला पाहायला मिळू शकते.

