जव्हार प्रतिनिधी,
जव्हारमध्ये नैसर्गिक शेती प्रशिक्षण कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद,
जेएसडब्ल्यू फाउंडेशन फेलोशिप प्रोजेक्ट अंतर्गत, एटीएमए विभाग आणि तालुका कृषी अधिकारी, जव्हार यांच्या सहकार्याने नैसर्गिक शेतीवर आधारित प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.पिंपळशेत व वनवासी या गावांमध्ये झालेल्या दोन सत्रांत एकूण १५० हून अधिक शेतकरी सहभागी झाले होते.तालुका कृषी विभागाचे ब्लॉक टेक्नॉलॉजी मॅनेजर सुनील महाला यांच्या मार्गदर्शनाखाली नैसर्गिक शेतीचे मूलभूत तत्त्व, नैसर्गिक कीटकनाशके आणि सेंद्रिय खतांचा वापर आदी विषयांवर शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांमध्ये विचारमंथन झाले आणि शाश्वत शेतीसाठी सामूहिक वचनबद्धतेची भावना तयार झाली.या उपक्रमाचे आयोजन जेएसडब्लू फाउंडेशनचे फेलो विवेक शहारे यांनी केले.यावेळी आपल्या मनोगतात सांगितले ” या उपक्रमाचा उद्देश केवळ शेतकऱ्यांना व्यावहारिक कौशल्ये देणे नव्हे तर पर्यावरणपूरक व शाश्वत शेतीकडे दृष्टिकोन तयार करणे आहे.” हा कार्यक्रम राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान अंतर्गत राबवण्यात आला होता.यावेळी कार्यक्रमात सहा.कृषी अधिकारी विकास भदाणे आणि लक्ष्मीकांत भुसारे यांनी परंपरागत कृषी विकास योजना,डॉ. पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती अभियान यासारख्या योजनांची माहिती दिली.तसेच,प्रधानमंत्री फसल विमा योजना किसान क्रेडिट कार्ड यासारख्या योजनांचे मार्गदर्शनही करण्यात आले.कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी ग्रामपंचायत पिंपळशेतचे सरपंच दिनेश जाधव व ग्रामपंचायत रायतळे सरपंच अरुणा चौधरी यांनी आयोजकांचे आभार मानले आणि शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तयार करण्याचे आवाहन केले. अभिषेक सागर,जेएसडब्लू फाउंडेशन फेलो यांनीही कार्यक्रमात सहकार्य केले.

