दीपक मोहिते,
” बॉटमलाईन,”
सरकार मुर्दाड बनले आहे,
शेतकऱ्यांच्या आयुष्याला कोणाचीच गॅरंटी नाही…
राज्याच्या कृषिक्षेत्रावर गेल्या दोन ते तीन दशकापासून अनेक संकटे आदळत आहेत. अवकाळी पाऊस,गारपीटी व नापिकी,अशा अस्मानी संकटामुळे आतापर्यंत दोन लाख शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे.आजही ते दुष्टचक्र सुरूच आहे.दोन दिवसापूर्वी परभणी जिल्ह्यात माळसोन्ना या गावात सचिन जाधव या तरुण शेतकऱ्यांने आत्महत्या केली,हे दुःख सहन न झाल्यामुळे त्याची पत्नी ज्योती हीने देखील विषारी औषध घेवून आत्महत्या केली.राज्यात २०२४ मध्ये २ हजार ७०६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसात बाजरी,मका,मिरची,सोयाबीनसह आंबा,द्राक्ष,डाळिंब व मोसंबी,या फळ उत्पन्नाचेही प्रचंड नुकसान झाले आहे.मात्र सत्ताधारी मंडळी या लाखो बाधित शेतकऱ्यांना ” मोदींची गॅरंटी,” देत नाहीत.महाराष्ट्रात असलेले महायुतीचे सरकार हे शेतकऱ्यांवर आलेल्या या संकटावर चकार शब्द काढत नाहीत,हे महाराष्ट्राचे खऱ्या अर्थाने दुर्देव आहे.अवकाळी व गारपिटीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास काढून घेतला आहे.त्यामुळे विदर्भ व मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढण्याची भिती व्यक्त होत आहे.पण तीन इंजिनचे सरकार आपल्याच मस्तीत आहे.
दरवर्षी राज्यातील शेतकऱ्यांना,
उशिराने येणारा पाऊस, अवकाळी व गारपिटी,अशा नैसर्गिक संकटासोबत निर्यातबंदी,निर्यात शुल्कवाढ व उत्पादीत शेतमालाला योग्य हमीभाव न देणे,अशा मानवनिर्मित संकटाला तोंड द्यावे लागते.गेली दोन दशके हे दुष्टचक्र असेच सुरू आहे.गेल्या तीन महिन्यात विदर्भ व मराठवाड्यात दीड हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या,पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाही शेतकऱ्याच्या घरी गेले नाहीत,त्यांच्या कुटुंबियांच्या डोळ्यातील अश्रू पुसावेसे त्यांना वाटले नाही.पण सलमान खानच्या घराच्या भिंतीवर गोळीबार झाला,तेंव्हा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेळात वेळ काढून थेट त्याचे निवासस्थान गाठले व त्याला प्रेमभराने आलिंगन दिले.ज्या तत्परतेने शिंदे यांनी सलमानचे घर गाठले,तीच तत्परता त्यांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत दाखवली असती तर लोकांनी त्यांना डोक्यावर घेतले असते. ” मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे,” त्यांचे दुःख मी जाणतो,” असे पालुपद सतत लावणारे हे माजी मुख्यमंत्री शिंदे आपल्या गावी असलेल्या शेतीची कामे करण्यासाठी अधून मधून हेलिकॉप्टरने जात असतात.वास्तविक गावी जाताना त्यांनी आपले हेलिकॉप्टर विदर्भ व मराठवाडा विभागावरून नेल्यास त्यांना झाडावर गळफास घेऊन शेतकरी कशा आत्महत्या करतात,हे पाहायला मिळाले असते.ते चित्र पाहिल्यानंतर त्यांनाही वाटलं असत,कि या शेतकऱ्यांच्या आयुष्याला खरचं कोणाचीच गॅरंटी नाही.नापिकी,ओला आणि कोरडा दुष्काळ व कर्जबाजारीपणा,ही शेतीच्या पाचवीला पूजली आहेत. राज्यात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची आकडेवारी पाहता दररोज सरासरी सात शेतकरी आत्महत्या करतात. बहिणीच्या लग्नासाठी सचिन जाधव याने शिवारातील शेती तारण ठेवून स्टेट बँकेकडून कर्ज घेतले होते.पण ते कर्ज कसे फेडायचे अशा विवंचनेत तो होता.अखेर तणावाखाली येऊन त्याने विष घेतले व आपले आयुष्य संपवले. त्याच्या पाठोपाठ पत्नी ज्योती हीनेही विषारी औषध घेऊन आत्महत्या केली.सचिनला दोन चिमूकले आहेत,त्यांचे पुढे काय ? आपले उर्मट कृषिमंत्री माणिकराव कोकाटे म्हणतात, सरकार शेतीच्या प्रत्येक कामाला पैसे देत असते,मग कर्जमाफी कशासाठी हवी ? कर्ज घेवून लग्न सोहळे आता बंद करा,असा सल्लाही द्यायला ते विसरत नाहीत,हे राज्यातील शेतकऱ्यांचे खरे दुर्देव आहे.

