वसंत भोईर,वाडा
चांबळ्याचा देशी पांढरा कांदा बाजारात दाखल,
ज्या कांद्याची दरवर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस आतुरतेने वाट पाहिली जाते,असा औषधी गुणधर्म असलेला वाडा तालुक्यातील चांबळे येथील प्रसिद्ध पांढरा कांदा बाजारात दाखल झाला आहे. कांदा माळा बनवून विक्रीसाठी बाजारात उपलब्ध झाला आहे.
दोन किलो वजनाची एक माळ १३० रु.प्रमाणे विक्री करण्यात येत आहे. अनेक संकटावर मात करत जांभळा गावातील शेतकऱ्यांनी यावर्षी पांढरा कांदा मोठ्या प्रमाणात पिकवला आहे.
भात पीक कापणी झाल्यानंतर पांढरा कांदा लागवडीला सुरुवात होते. वाडा तालुक्यात चांबळा, डाकवली,असनस,चिखला, गातेस,केळठण या काही मोजक्याच गावात पांढऱ्या कांदा लागवड करण्यात येत असते.पोषक वातावरण आणि पारंपारिक लागवड,यामुळे आजही पांढरा कांदा आपले औषधी गुणधर्म टिकवून आहे. बाजारात या कांद्याला मोठी मागणी आहे आणि ती सतत वाढतच आहे.
तालुक्यात प्रामुख्याने चांबळे,डाकीवली,केळठण या गावांमध्ये पांढऱ्या कांद्याचे पीक घेतले जात असे. त्यानंतर तालुक्यात इतरही गावांमध्येही शेतकरी पांढऱ्या कांद्याची लागवड करू लागले. यावर्षी तालुक्यात बऱ्यापैकी पांढऱ्या कांद्याची लागवड करण्यात आली आहे.
यंदा नैसर्गिक संकटांवर मात करत बऱ्यापैकी पांढऱ्या कांद्याचे उत्पादन शेतकऱ्यांनी घेतले आहे.पांढऱ्या कांद्याला चांगला भाव मिळेल,अशी अपेक्षा शेतकऱ्याना आहे. शेतात कांदा तयार झाला असून,शेतकरी सध्या काढणी करत आहेत.कांदा काढल्यानंतर उन्हात दहा ते पंधरा दिवस सुकवला जातो. त्यानंतर घरी आणून मजुराकडून त्याच्या माळा बांधण्यात येतात.
शेती अभ्यासकांच्या माहितीनुसार,या कांद्यात औषधी गुणधर्म आहेत. कांद्यात मिथाईल सल्फाईड, अमिनो ऍसिड हे घटक असतात.ज्यामुळे कॅलोस्ट्रोलचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते.पोटातील उष्णता कमी होण्यासाठी कांदा उपयुक्त ठरतो.रक्ताचे प्रमाण वाढण्यास मदत होते.जर सर्दी, कफची समस्या असेल तर ताज्या कांद्याचा रस मध टाकून प्यायल्यास हा आजार दूर होतो.सध्या कांदा काढणी सुरू असून,तो सुकवून माळा तयार करण्यात येत आहेत.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग परिसरातील पांढऱ्या कांद्याला चांगला भाव मिळतो, मात्र आपल्याकडे उत्पादन खर्चाच्या मानाने भाव मिळत नाही.शासनाने पांढऱ्या कांद्याला अनुदान देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
– विवेक कृष्णा पाटील, पांढरा कांदा उत्पादक शेतकरी चांबळे,

