दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – वनमंत्री गणेश नाईक यांच्यात शीतयुद्ध सुरू,
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खिंडित पकडण्याची एकही संधी भाजप सोडत नाही,असे स्पष्ट होत आहे.मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अनेक निर्णयाना फडणवीस सरकारने यापूर्वीच स्थगिती दिली आहे.तर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक,या दोघांनी ठाणे व पालघर जिल्ह्यावरील शिंदे गटाचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी कंबर कसली आहे.
पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काही दिवसांपूर्वी गणेश नाईक यांनी पालघर येथे जनता दरबार आयोजित केला होता.या जनता दरबारात ” सबकुछ भाजप,” असे चित्र पाहायला मिळाले.शिंदे गटाचे अनेक पदाधिकारी या दरबाराकडे फिरकलेच नाही.या दरबारानंतर गणेश नाईक यांनी शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात जनता दरबार भरवला.वास्तविक या जिल्ह्याचे पालकत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे असताना गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार भरवणे,म्हणजे थेट एकनाथ शिंदे यांना आव्हान देण्यासारखे होते.या संदर्भात माध्यामानी फडणवीस यांच्याकडे विचारणा केली असता फडणवीस यांनी ” कोणी,कुठेही जनता दरबार भरवू शकतो,” असे सांगत त्यांनी शिंदे यांची अवस्था ” सहनही होत नाही,आणि सांगताही येत नाही,” अशी केली.या सर्व घडामोडीनंतर शिंदे यांनी आता परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांना पालघर येथे जनता दरबार आयोजित करायला लावला आहे.एकाच जिल्ह्यात दोन कॅबिनेट मंत्री दरबार भरवतात,यावरून महायुती सरकारमध्ये तीव्र स्वरूपाचे मतभेद असून ते सध्या सुप्तावस्थेत आहेत,हे स्पष्ट होत आहे.शिंदे गटाने या दरबाराला ” लोकदरबार,” असे गोंडस नाव दिले आहे.” शिंदे गटाच्या या हालचालीनंतर नाईक यांनीही ठाण्यात पुन्हा जनता दरबार भरवण्याचे संकेत दिले आहेत.तर दुसरीकडे भाजपचे आ.संजय केळकर यांनी ठाणे जिल्हा भाजपचा गड असून या जिल्ह्यात आमचे सर्वाधिक म्हणजे नऊ आमदार असल्याचे म्हंटले आहे.या सर्व घडामोडीवरून एक गोष्ट स्पष्ट होत आहे की भाजपकडून शिंदे यांची सर्वबाजुनी कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

