वसंत भोईर,वाडा
वाड्यात किती शेतकऱ्यांनी केली मातीची आरोग्य तपासणी ?
आपल्या शेतीची माती भरघोस पीक घेण्यायोग्य असावे,यासाठी किमान एक वर्षआड तरी माती परीक्षण करावे यासाठी जनजागृती केरण्यात येत असते.परंतु अनेक शेतकरी या महत्वाच्या कामाकडे दुर्लक्ष करतात. शेतकऱ्यांनी मातीची आरोग्य तपासणी केल्यास मातीतील खनिजांच्या प्रमाणानुसार खत व्यवस्थापन करणे,सोयीचे होत असते.
मात्र अनेक शेतकरी माती परीक्षण न करताच रासायनिक खतांचा वापर करत असतात.सामान्यत: शेतातील मातीचे किमान तीन ते चार वर्षातून एकदा माती परीक्षण करायला हवे.मात्र, वर्षानुवर्ष शेतात तेच पीक घेत असल्यास दरवर्षी माती परीक्षण नाही केले तरी चालते. तालुक्यात काही शेतकरी माती परीक्षण करून खत व्यवस्थापन करीत असल्यामुळे त्यांचे पीक जोमात येते व त्याचा शेतकऱ्यांना फायदा होत असतो.त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करायला हवी.
शेतजमिनीत कोणत्या घटक द्रव्याचे प्रमाण किती आहे व कोणत्या घटक द्रव्याचे प्रमाण आवश्यक आहे.हे तपासण्यासाठी माती परीक्षण आवश्यक आहे.त्यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हा मृद संरक्षण अधिकारी कार्यालयाला माती नमुने सादर करणे गरजेचे आहे.या कार्यालयात आवश्यक शुल्क भरून माती परीक्षण करता येते.अनेक शेतकरी स्वतः नमुने घेऊन तपासणीसाठी या कार्यालयात येत असतात.
गेल्या वर्षी तालुक्यात ४०० शेतकऱ्यांनी आपल्या मातीचे नमुने तपासले.आता हे शेतकरी आवश्यकतेनुसार खत व्यवस्थापन करीत आहेत.
शेतीतील मातीचा पोत बिघडण्यास सर्वस्वी शेतकरी जबाबदार असतो.अधिक उत्पादन मिळावे,यासाठी शेतकरी रासायनिक खताचा वापर करतो.शिवाय प्रमाणापेक्षा खत टाकले जात असल्याने जमिनीचा पोत बिघडतो.मातीचे नमुने तपासल्यानंतर शेतकऱ्यांना त्याच्या जमिनीचे आरोग्य कळत असते.त्यानुसार शेतकऱ्याला या जमिनीत कोणत्या पिकाची लागवड करावी,याबाबत कळते.मृदाकार्डमुळे शेतकऱ्यांना आपल्या पीक पद्धतीत बदल करता येतो.
तालुक्यात एकेकाळी शेतकरी सेंद्रिय शेती करत असत.आता मात्र शेतकरी रासायनिक खतांचा वारेमाप वापर करीत आहेत.त्यामुळे जमिनीचे आरोग्य बिघडत चालले आहे.शिवाय कीटकनाशके,तणनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असल्याने मातीचे आरोग्य बिघडत आहे.मातीचे आरोग्य कायम ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना सेंद्रिय खत वापरणे आवश्यक आहे. तेव्हाच शेतातील पिकांना फायदा होईल.
शेतकऱ्यांनी पीक पेरण्यापूर्वी माती परीक्षण करावे,उन्हाळ्यात शेतात पीक नसताना माती नमुने घ्यावे. जमिनीच्या आरोग्यासाठी माती परीक्षण हे पीक वाढीच्या दृष्टीने फायद्याचे ठरते.
– संजय घरत,कृषी अधिकारी

