वसंत भोईर,वाडा
वाडा – बेरशेतीत मिरची पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव,
तालुक्यातील बेरशेती या गावातील अनेक शेतकऱ्यांनी मिरचीची लागवड केली होती. मात्र हवामान बदलामुळे मिरची पिकावर करपा या रोगाचा प्रादुर्भाव झाला व हाती आलेले पिक वाया गेले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
वाडा तालुक्याला भाताचे कोठार म्हणून राज्यभरात ओळख आहे.वाड्याचा तांदूळ ” वाडा कोलम,” या नावाने प्रसिद्ध आहे,असे असले तरी भातशेती हा व्यवसाय पुर्णत: निसर्गावर अवलंबुन आहे. तसेच मजूरांचा तुटवडा,खते,बी-बियाणे, औषधे यांची भरमसाठ दरवाढ,आदी कारणामुळे भातशेतीचा व्यवसाय आता शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यामुळे येथील बहुतांशी शेतकरी हे भात पीक घेतल्यानंतर आपल्या शेतीत असलेल्या पाण्यावर विविध प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड करत असतात.यातून त्यांना खर्च वजा जाऊन ठोस उत्पन्न मिळत असते.
तालुक्यातील बेरशेती येथील काळुराम भोईर, भगवान मढवी,रवींद्र भोईर, विलास भोईर या शेतकऱ्यांनी सुमारे पाच एकर जागेत मिरचीची लागवड केली होती. मात्र वातावरण बदलामुळे या मिरचीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला व सर्व मिरची करप्याच्या भक्ष्यस्थानी पडली आहे.त्यामुळे हातीतोंडी आलेला घास निघून गेला आहे.या नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे.मिरची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांनी हजारो रू.खर्च केले होते.
दरम्यान मिरची नुकसानीचे पंचनामे करून आम्हाला नुकसान भरपाई द्यावी,अशी मागणी शेतकरी काळुराम भोईर यांनी केली आहे.

