वसंत भोईर,वाडा
ढगाळ वातावरणामुळे भाजीपाला पिकांवर संकट
तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढल्याने भाजीपाला, काकडी,मिरची,भेंडी,दुधी, भोपळा,घोसाळी पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. दिवसभर असलेल्या ढगाळ वातावरणामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम झाल्याने ग्रामीण भागातील शेतकरी संकटात सापडले आहेत.
वाडा तालुक्याचे तापमान सध्या ३९ ते ४० अंशापर्यंत पोहोचले आहे.त्यामुळे पिकांच्या वेलीला लागणारी फळे करपत असून त्यांचा आकार लहान होत आहे. अशातच घोसाळी,मिरची पिकांवर करपा रोग पडल्याने उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.तालुक्यातील जाळे,वारनोळ,गातेस, पिंपळास,गुंज,देवघर, बुधावली परिसरातील शेतकरी उन्हाळी भाजीपाल्याचे मोठे उत्पन्न घेतात भिवंडी, कल्याण,ठाणे,वसई,विरार येथून मागणी होत असते.परंतु गेले चार-पाच दिवस वातावरणात उष्मा वाढल्याने भाजीपाल्याचे उत्पादन घटल्याची माहिती शेतकरी प्रदीप गोरे यांनी दिली.

