दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होईस्तोवर अनाहूत पाहुण्यापासून लांब राहा..
काल गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांच्या आवेशपूर्ण भाषणाने मनसे सैनिक चांगलेच चार्ज झाले आहेत.या मेळाव्यात राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात आपण पुन्हा हिंदुत्वाकडे वळत असल्याचे संकेत दिले आहेत.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर डोळा ठेवून त्यांनी औरंगजेबाच्या कबरीचा विषय आपल्या भाषणाचा प्रमुख मुद्दा बनवला होता.तो १०० % यशस्वी ठरला.त्यांच्या घणाघाती भाषणाने मनसे सैनिक अक्षरशः भारावून गेले होते.
आपल्या भाषणात फडणवीस सरकारला चांगल्याच कानपिचक्या दिल्या.ते म्हणाले,” फडणवीस तुमच्या हातात चांगले राज्य आले आहे,तर चांगला कारभार करा.राज्यासमोर अनेक ज्वलंत विषय आहेत,ते लक्षात घेऊन कारभार करा.आपल्याला जंगल व पाणी या दोन विषयाचे काही पडलेले नाही,त्याकडे लक्ष द्या.” राज ठाकरे यांच्या या बदलत्या भूमिकेचे जनता नक्कीच स्वागत करेल,पण त्यांची ही भूमिका नेहमीप्रमाणे निसरडी राहता कामा नये.कारण आजवरचा अनुभव असा आहे की ज्या ज्या वेळी राज ठाकरे आक्रमक होतात.त्या त्या वेळी भाजपचे आशिष शेलार,प्रवीण दरेकर,देवेंद्र फडणवीस,चंद्रशेखर बावनकुळे,प्रसाद लाड,हे चहा पिण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल होत असतात,असा आजवरचा अनुभव आहे.यावेळी त्यांनी तसं होऊ दिले नाही तर त्यांच्या मनसेला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत चांगले यश मिळू शकेल.मागच्या काही वर्षात घडलेल्या घडामोडीची पुनरावृत्ती झाल्यास त्यांची पाटी पुन्हा कोरी राहण्याची शक्यता आहे.कालच्या त्यांच्या भाषणाने मनसे सैनिकांना प्राणवायू देण्यात राज ठाकरे यशस्वी झाले आहेत.पण या प्राणवायूचा पुरवठा सुरू ठेवणे,हे केवळ राज ठाकरे यांच्याच हातात आहे.त्यांची प्रखर हिंदुत्वाची भूमिका भाजपला परवडणारी नाही,त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची ” पॉयझन गँग,” पुन्हा कामाला लागण्याची शक्यता आहे.त्यांच्या या अनाहूत पाहुण्यांना सध्या तरी राज ठाकरे यांनी दूर ठेवणे,अगत्याचे आहे.कारण या चहापानाच्या डिप्लोमासीमुळे मनसेचे आजवर खूप नुकसान झाले आहे.त्यामुळे हे टाळण्यातच राज ठाकरे व त्यांच्या मनसेचे हित आहे.

