वसंत भोईर,वाडा
वाडा वन परीक्षेत्रात खैर तस्करांवर पुन्हा संक्रान्त,
तालुक्यातील कंचाड वनपरिक्षेत्रात खैर तस्कर चोरीच्या उद्देशाने येणार असल्याची माहिती वाडा दक्षता पथकाला मिळताच त्यांनी सापळा रचला होता. पण त्याची खबर लागताच अंधाराचा फायदा घेऊन खैर तस्कर पसार झाले.मात्र खैराच्या २४ ओडक्यांसह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात वनविभागाला यश आले.
सदर घटना रात्रीच्या सुमारास घडली.वाडा दक्षता पथकाचे वनक्षेत्रपाल यांना मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील कंचाड वन परिसरात खैर तस्कर,चोरीच्या उद्देशाने येणार असल्याचे माहिती मिळाली होती. त्यांनी रात्री ९.३० वाजल्यापासून पाळत ठेवली होती.रात्री १.०० ते २.०० च्या सुमारास अंदाजे १५ ते २० इसम खैर झाडे तोडण्याच्या इराद्याने राखीव वन क्षेत्रात घुसले.त्यांनी जंगलात काही उभ्या झाडांचे तुकडे करून सुमारे २४ ओंडके वाहनांत भरले.त्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना आवाज दिला असता सर्व तस्कर माल जागेवर टाकून अंधाराचा फायदा घेत पसार झाले.खैराच्या २४ ओंडक्यासह टेम्पो जप्त करण्यात आला असून त्याची किंमत मुद्देमालासह पाच लाखांच्या आसपास आहे.
ही कारवाई जव्हार वनविभागाचे दक्षता पथकाचे वनक्षेत्रपाल शरण देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली कंचाडचे वनक्षेत्रपाल स्वप्नील मोहिते,वनपाल प्रकाश साळुंखे,दामु मौले,वनरक्षक सुभाष वाघमारे,माधव केदार, प्रमोद धानवा,रोहीत सांबरे, जावेद खान,प्रकाश रिंजड, वनमजूर रवींद्र पवार आदींच्या पथकाने केली.

