वसंत भोईर,वाडा
सरकारच्या निष्क्रियतेमुळे वाड्यातील शेतकऱ्यांची दैनावस्था,
गेल्या पाच वर्षापासून शेतकऱ्यांना खरीप हंगामात नापीकीपणाचा सामना करावा लागत आहे.यंदाही खरीप हंगामात अतिवृष्टी व दोनदा आलेल्या महापुरामुळे होत्याचे नव्हते झाले.हाती आलेले धानाचे पीक मातीमोल झाले आहे.नदी व नाल्यांच्या काठावरील शेती पिकांसह खरडून वाहून गेली.त्यातच लष्करी अळीसह कीड व रोगांनी पीक नेस्तनाबूत केले आहे.
यंदा शासनाने तेवीसशे रु.चा हमीभाव जाहीर केला.परंतु दोन महिने उशिरा हमीभाव केंद्र सुरू झाले. आर्थिक अडचणीमुळे व्यापाऱ्यांना प्रति क्विंटल दोन हजार रु.च्या भावाने धान विकावे लागले.सोने पिकवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या हाती यंदा माती पडली आहे.धानाची साडेसाती शेतकऱ्यांचा पिच्छा सोडताना दिसत नाही.शासनाच्या मार्गदर्शनामध्ये शेतकरीवर्ग धानाच्या शेतीत विविध प्रयोग करत असतात.परंतु धानाचे उत्पादन एकरी दहा ते बारा क्विंटल पेक्षा अधिक होत नाही.अल्प उत्पादनाने शेतकरी हवालदिल झाला आहे.यंदा शेतकऱ्यांना धान विक्रीसाठी कसरत करावी लागली.तसेच विक्री झालेल्या धानाचे पैसे अजूनही मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे.
वाडा तालुक्यात सुमारे दहा हजार पाचशे हे.जमिनीवर धान पिकाची लागवड होत असते.मात्र धानाची शेती परवडत नसल्याचा अनुभव शेतकऱ्यांना सातत्याने येत आहे.त्यामुळे शेतकरी आता इतर पिकांकडे वळत आहेत.
फेब्रु.नंतर धानाची आवक कमी होते.त्यामुळे या महिन्यापासून भाव वाढतात, असा शेतकऱ्यांचा अनुभव असला,तरी यावर्षी मात्र उलट स्थिती आहे.यंदा दानाचे भाव अद्याप फारसे वाढलेले नाही.त्यातच मिळालेला हमीभाव परवडणारा नाही.
दरवर्षी इंधन,मजुरी, मशागत,निंदनीचा खर्च वाढत चालला आहे.त्यातच शेतीसाठी मजुर मिळणे देखील कठीण झाले आहे.अशाही स्थितीत शेतकऱ्यांना संपूर्ण कुटुंबासह शेतात राबल्याशिवाय गत्यंतर नाही.
अलीकडे संकरित वाणांची लागवड केली जाते.विविध प्रकारची रासायनिक खते,किटकनाशके वापरली जातात.परंतु बियाणे खतांच्या किमती शेतकऱ्यांचे जगणे कठीण करत आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही.
नोव्हें.महिन्यात हाती आलेल्या धानाचे भाव वाढतील,याअपेक्षेने आत्तापर्यंत शेतकऱ्यांनी धान घरातच साठवून ठेवले होते.मात्र,अद्याप धान्याचे भाव वाढले नाहीत,उलट धानाचे भाव कमी होत आहेत.त्यामुळे शेतकरी पीक कर्ज भरण्याच्या उद्देशाने धानाची विक्री करीत आहेत.
धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हे.२० हजार रु.प्रोत्साहनपर रक्कम देण्याचे आश्वासन राज्य शासनाने दिले आहे, मात्र ही रक्कम अद्याप मिळालेली नाही.

