वसंत भोईर,वाडा
कच-याच्या आगीच्या धुराने गुदमरतोय कुडूसच्या नागरिकांचा श्वास
कुडूस ग्रामपंचायत हद्दीत जमा होत असलेला कचरा चिंचघर रोड परिसरात टाकण्यात येत असतो.हा कचरा संध्याकाळच्या सुमारास तो पेटवून देण्यात येतो.आगीच्या धुराने या परिसरातील नागरिक त्रस्त झाले असून त्यांचा श्वास गुदमरु लागला आहे.मात्र ग्रामपंचायत प्रशासन याकडे डोळेझाक करीत आहे.
कुडूस ग्रामपंचायत ही तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असून तीचे उत्पन्न कोटींच्या घरात आहे.या ग्रामपंचायतीत दररोज अनेक टन कचरा जमा होत असतो. ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्याकडून या कच-याची विल्हेवाट लावण्यात येते. चिंचघर रोड परिसरातील कचरा या भागात टाकण्यात येतो.व त्यानंतर त्या कचऱ्याला संध्याकाळच्या सुमारास या परिसरात धुराचे साम्राज्य निर्माण होते.त्याचा त्रास लहान मुले व वयोवृद्ध नागरिकांना होत आहे.
सदर कचरा या ठिकाणी न पेटवता तो गावाबाहेर नेऊन पेटवावा,अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.यासंदर्भात कुडूस ग्रामपंचायतीचे उपसरपंच मुद्दस्सर पटेल यांच्याशी संपर्क साधला असता ग्रामस्थांची तक्रार लक्षात घेऊन सदर ठिकाणी कचरा टाकणे सध्या बंद केले आहे,असे सांगितले.

