नाशिक प्रतिनिधी,
” शहर खबरबात, ”
नाशिक शहराची वाटचाल गुन्हेगारी शहराच्या दिशेने सुरु,
नाशिक शहरातील वाढती गुंडगिरी लक्षात घेता पोलिसांची कार्यक्षमता पणाला लागण्याची चिन्हे आहेत. गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.या वाढत्या गुन्हेगारीला वेळीच आळा न घातल्यास या शहराची वाटचाल गुन्हेगारीच्या दिशेने सुरु होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नाशिक शहरांमध्ये गेल्या काही दिवसापासून गुंडगिरीचे प्रमाण सतत वाढत आहे. शहरातील गुंडगिरी नियंत्रणात न आणल्यास नागरिकांना दिवसेंदिवस जगणं कठीण होणार आहे.शहरामध्ये दोन दिवसाआड तरुणांच्या हत्या होत आहेत.गटागटांमध्ये हाणामाऱ्या होत आहेत,घटना घडल्यानंतर पोलीस यंत्रणा कामाला लागते,त्यामुळे गुंड गुन्हा करून फरार होत असतात.शहरातील अनेक गल्लीबोळात गुंडाच्या टोळ्या निर्माण झाल्या आहेत.यावर वेळीच उपाययोजना न केल्यास पुण्यासारखी स्थिती या शहराची होईल,अशी भिती नागरिक करत आहेत. रंगपंचमीच्या दिवशी रात्री राजकीय पक्षाचे पदाधिकारी असलेला तरुण आणि त्यांच्या भावाचा हत्या करणाऱ्या पाच संशियतांना अटक करण्यात पोलिसांना नुकतेच यश मिळाले आहे.उमेश उर्फ मुन्ना भगवान जाधव ( ३२ )आणि त्याचा धाकटा भाऊ प्रशांत भगवान जाधव ( ३० ) अशी या भावंडांची नावे आहेत.परवा रात्री नऊच्या दरम्यान हे दोघे भाऊ घरी जात असताना संशयित आरोपीनी यापूर्वी झालेल्या भांडणाची कुरापत काढली. त्यानंतर झालेल्या भांडणात त्यांनी धारदार शस्त्रांनी या दोन भावांची हत्या केली व मारेकरी दुचाकीवरून पसार झाले.नाशिक पोलिसांनी या प्रकरणी तातडीने तपास करून पाच आरोपींना शोधून काढण्यात यश मिळवले.या संशयित आरोपीना न्यायालयापुढे हजर करण्यात आले आहे.याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी पुढील तपास करत आहेत.

