अनंत भोईर, पालघर
पालघर जिल्ह्यात एकाच दिवशी ६० हजार २८८ घरकुलांचा शुभारंभ,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १०० दिवस कृती कार्यक्रम अंतर्गत पालघर जिल्ह्यात ६० हजार ८९२ घरकुलांना मंजुरी देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्यापैकी ६० हजार २८८ घरकुले मंजुर करणार आली आहेत.घरकुल लाभार्थी संवाद अभियान २०२५ स्वप्न घरकुलाचे साथ शासनाची” या उपक्रमांतर्गत आज अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांसोबत संवाद साधला.या ऐतिहासिक अभियानाचा शुभारंभ आज मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक डॉ.रूपाली सातपुते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप, तसेच जिल्हा परिषदेचे सर्व विभागप्रमुख,गटविकास अधिकारी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हाभरात पार पडला. तसेच जिल्ह्यात उमेद अभियानातर्फे सुरू करण्यात आलेल्या घरकुल मार्टचे देखील उद्घाटन करण्यात आले.
गंजाड ( डहाणू ),चिंचघर ( विक्रमगड ),गारगाव ( वाडा ), उपलाट ( तलासरी ), आसे ( मोखाडा ), रायतळे, कासाटवाडी ( जव्हार ),भाताणे ( वसई ) आणि सावरे एंबुर ( पालघर ) येथे घरकुल मार्ट सुरू करण्यात आली आहेत. एम्बुर येथील घरकुल मार्टचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी तर गंजाड येथील उद्घाटन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात ६ हजार २९ अधिकारी व कर्मचारी मानधनी कर्मचारी व तसेच, जिल्हास्तरीय ३१ वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जिल्ह्यातील २०० किंवा त्यापेक्षा अधिक घरकुल उद्दिष्ट असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये विविध खातेप्रमुख आणि अधिकाऱ्यांच्या गावभेटीचे नियोजन करण्यात आले होते.
जिल्ह्यात आणि डहाणू तालुक्यात गंजाड ग्रामपंचायत मध्ये सर्वाधिक म्हणजे ८६७ घरकुलांना मंजुरी मिळाली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी सावरे एंबुर येथे महिलांशी चर्चा करत घरकुल योजनेच्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन केले.तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक डॉ.रूपाली सातपुते यांनी महिलांना सूचना आणि मार्गदर्शन केले.
“तुमच्या स्वप्नातील घर साकारण्यासाठी आम्ही मदत करू,पण तुम्हीही सहकार्य करा.लवकरात लवकर घर बांधायला सुरुवात करा आणि घरकुल पूर्ण करा,” असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी यावेळी लाभार्थ्यांना केले.
घरकुल योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय अधिकारी, कर्मचारी,ग्रामसेवक,सरपंच आशा सेविका,अंगणवाडी सेविका आणि उमेद अभियानातील अधिकारी,सीआरपी ताई,गटांच्या महिला यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
घरकुल मार्टमुळे लाभार्थ्यांना साहित्य वेळेत आणि माफक दरात मिळणार असून, महिलांना रोजगाराच्या संधीही निर्माण होणार आहेत.त्यामुळे बांधकाम प्रक्रियेला वेग येणार आहे.हे उद्दिष्ट लवकर पूर्ण होईल,असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सुरू असलेल्या घरकुलांना भेटी देऊन नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या घरांचे भूमिपूजन केले.तसेच ज्या लाभार्थ्यांची माहिती गुगल फॉर्ममध्ये भरली नसेल ती त्वरित भरून घेण्याचे आदेश यावेळी संबंधित कर्मचाऱ्यांना दिले.
यावेळी पालघर गट विकास अधिकारी बापूराव नाळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तन्वीर शेख,ग्रामसेविका करुणा राऊत,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.
घरकुल लाभार्थ्यांना घरकुलाच्या बांधकामासाठी आवश्यक साहित्य माफक दरात आणि वेळेत उपलब्ध व्हावे,यासाठी ‘घरकुल मार्ट’ संकल्पना राबवण्यात आली आहे.महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ( उमेद ) अभियान अंतर्गत स्थापन झालेल्या महिला ग्रामसंघाच्या माध्यमातून ही विक्री केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. यामुळे लाभार्थ्यांना त्यांच्या गावातच माफक दरात बांधकाम साहित्य मिळणार आहे आणि उमेदच्या महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

