वसंत भोईर,वाडा
कोकणातील खनिज संपत्ती भांडवलदारांच्या घशात,
पालघर – डहाणूपासून सिंधुदूर्गपर्यंत असणारे विविध तेलसाठे,बॉक्साइट व अन्य खनिज संपत्ती ही अदानी – अंबानी या भांडवलदारांच्या घशात घालण्याचा डाव राज्य सरकारचा आहे.प्रचंड बहुमत असलेले भाजप सरकार,हे सर्वसामान्यांच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी धार्मिक ध्रुविकरण करून समाजात फूट पाडत असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज वाडा येथे केली.
काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हर्षवधन सपकाळ यांनी आज प्रथमच पालघर जिल्ह्याचा दौरा केला.यावेळी वाडा येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी वरील भूमिका मांडली.राज्यात शेतमालाला भाव नाही,शेतकरी प्रचंड संकटात आहे,बेरोजगारीने परमोच्च टोक गाठले आहे,सरकारकडे विकासासाठी पैसा नाही. राज्य सरकारने मांडलेल्या प्रचंड तुटीच्या अर्थसंकल्पामुळे खर्च आणि उत्पन्नाचा मेळ हुकला असुन विकास योजनांकरिता हे सरकार निधी देऊ शकत नाही.राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे.सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर काम न करता,सरकार धार्मिक धृविकरणाचे राजकारण करत असल्याचा आरोप सपकाळ यांनी यावेळी केला.
सरकारकडे पाशवी बहुमत असल्याने ते कोणाला जुमानत नाहीत.खरंतर या बहुमताच्या जोरावर सर्वसामान्यांच्या हिताचा राज्यकारभार करणे अपेक्षित आहे,परंतु हे तीन पक्षाचे सरकार या पट्ट्यातील जमिनी,खनिज संपत्ती,अदानी आणि अंबानीसारख्या बड्या भांडवलदारांच्या घशात घालण्याचे करत आहे.या विरोधात काँग्रेस पक्ष संघर्षात्मक भूमिका घेत लोकांच्या बाजूने लढा उभारेल,अशी घोषणा सपकाळ यांनी केली.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष गणेश पाटील,किसान कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पराग पष्टे,प्रदेश सचिव मनिष गणोरे, जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल पाटील, सहाकार कॉंग्रेसचे उपाध्यक्ष नीलेश भोईर,आदिवासी सेलचे प्रदेशाध्यक्ष बळवंत गावित, महिला आघाडीच्या नेत्या संगिताताई धोंडे,प्रवक्ता अविश राऊत,कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप पाटील आदी उपस्थित होते.
केवळ मते मिळवण्यासाठी आणलेल्या लाडकी बहिण योजनेकरिता राज्य सरकारकडे आता पैसा नाही.त्यामुळे दहा लाख लाडक्या बहिणीच्या नावांना कात्री लावण्यात आली आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी सरकारकडे पैसा नसल्यामुळे आदिवासी विकास विभाग व समाजकल्याण विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेकडे वळवला जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

