सुरेश वैद्य,पालघर
२८ मार्च रोजी पालघर येथे जनता दरबाराचे आयोजन,
राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली २८ मार्च रोजी सकाळी ९.०० वाजता जनता दरबाराचे आयोजन जिल्हा नियोजन समिती सभागृह,जिल्हाधिकारी कार्यालय,पालघर येथे करण्यात येणार आहे.
आयोजित करण्यात येणाऱ्या जनता दरबाराविषयी जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली त्यावेळी ते बोलत होते.
या जनता दरबारात नागरिकांनी आपली निवेदने तीन प्रतीमध्ये सादर करावित. नागरिकांनी लिखित स्वरूपात आपले प्रश्न नोंदवून घेण्यासाठी प्रशासनाने विविध विभागाच्या २० टेबलांची व्यवस्था केली असल्याचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी सांगितले.
सदर ठिकाणी जनता दरबारासाठी येणाऱ्या नागरिकांचे अर्ज नोंदणी करून टोकनचे वाटप करण्यात येणार आहे.तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर २० टेबल्स ठेवण्यात येणार आहे.सदर ठिकाणी नागरिकांच्या तक्रारी अर्जाचे निवारण करण्यासाठी संबंधित कार्यालयाचे कार्यालय प्रमुख उपस्थित राहणार आहेत.यादिवशी समाधान शिबिराचे आयोजन करण्यात येणार असून पात्र लाभार्थी यांना पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते समाधानपत्राचे वाटप करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी सांगितले.
यापूर्वी २० फेब्रु.रोजी आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारामध्ये नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला होता.
त्या जनता दरबारामध्ये ७५९ अर्ज जिल्हा प्रशासनास प्राप्त झाले होतेयामध्ये सर्वाधिक ३०२ अर्ज महसूल विभागाचे तर ४५७ इतर कार्यालयाचे अर्ज होते.
२८ मार्च रोजी होणाऱ्या जनता दरबारामध्ये नागरिकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून आपल्या समस्या किंवा प्रश्नाचा निपटारा करून घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी केले आहे.

