नाशिक प्रतिनिधी,
किल्ले रामशेज येथे श्रमदान व स्वच्छता मोहीमेचे आयोजन,
भारतीय जनता युवा मोर्चा आणि मावळा मित्र मंडळ यांच्यातर्फे आयोजित किल्ले रामशेज येथे
श्रमदान आणि स्वच्छता मोहीम पार पडली.
या मोहिमेत तरुणांसह किल्ले दुर्ग संवर्धन सभासद मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
नाशिक पेठ गुजरात महामार्गावर असलेल्या स्वराज्यातील रामशेज किल्ल्याला विशेष ऐतिहासिक महत्त्व असून छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात मुघलांनी केलेल्या हल्ल्यात रामशेजचा किल्लेदार आणि शत्रूच्या तुलनेत संख्येने खूपच कमी असलेल्या शूर मावळ्यांनी हा किल्ला सहा वर्षे लढवून मोघलांना नामोहरम केल्याचा इतिहास आहे.
या किल्ल्याकडे सरकारचे फारसे लक्ष नसले तरी दुर्गप्रेमींनी हल्ली या किल्ल्याकडे विशेष लक्ष दिले आहे.गड-किल्ल्यांचे संवर्धन आणि स्वच्छता राखण्याच्या उद्देशाने आयोजित या मोहिमेंतर्गत रामशेज किल्ल्यावरील परिसर स्वच्छ करण्यात आला.किल्ल्यावर वाढलेली गवत,झुडपे,प्लास्टिक आणि अन्य कचरा संकलित करून त्याची योग्य प्रकारे व्यवस्था लावण्यात आली.तसेच,गडाच्या संरक्षक भिंती आणि पायऱ्यांची डागडुजीही करण्यात आली.
या मोहिमेत स्थानिक गडप्रेमीही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.स्वयंसेवकांनी श्रमदान करत गडाच्या
संवर्धनासाठी योगदान दिले.
पर्यावरणपूरक पर्यटन वाढवण्यासाठी
स्वच्छता आणि गड संवर्धन गरजेचे असल्याचे मत आयोजकांनी यावेळी व्यक्त केले.किल्ले दुर्ग संवर्धनासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घ्यावा आणि
गडकोटांचे जतन करण्यासाठी
योगदान द्यावे,असे आवाहन
आयोजकांतर्फे करण्यात आले.कार्यक्रमाचे आयोजन भाजपचे तन्मय गांगुर्डे व वैभव रन्हेर यांनी केले.
यावेळी त्रंबकेश्वर परिसरातील अतिदुर्गम आदिवासी पाड्यावर जाऊन तेथील शाळेतील लहान मुलांना शालेय गरजू साहित्य वाटप केले.उपस्थित सर्व शिक्षक सेवक वर्ग,ग्रामपंचायत विभाग,लोकसेवक,नागरिक,आशा स्वयंसेविका व मित्र परिवार या उपक्रमास फार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

