संजय लांडगे,वाडा
पालघर येथे संचमान्यता रद्द करण्यासाठी शिक्षकांचे आंदोलन,
पालघर जिल्हाधिकारी कार्यालय येथे काल शिक्षक महामोर्चा आंदोलन करण्यात आले.यावेळी १५ मार्च २०२४ ची संचमान्यता रद्द करण्यासाठी सर्व शिक्षक संघटना यांनी अन्यायकारक शासन निर्णया विरोधात एल्गार पुकारला.यावेळी विविध संघटनाचे शिक्षक महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीला पाठिंबा देण्यासाठी आंदोलनात सहभागी झाले होते.या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष राजू महाले यांनी केले.
यावेळी शिक्षक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांना निवेदन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
१५ मार्च २०२४ शासन निर्णयानुसार २०२४-२५ संच मान्यता अंतिम करण्यात आली आहे.शिक्षण कायद्यातील तरतुदीच्या व २८ ऑगस्ट २०१५ सुधारित ८ जाने.२०१६ विसंगत,अशा शासन निर्णयाने शाळांमध्ये शिक्षकच असणार नाही,अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे राज्यात हजारो शिक्षक तर अतिरिक्त होतीलच परंतु शाळेत शिक्षक उपलब्ध नसल्याने गुणवत्तापूर्ण शिक्षणात अडसर निर्माण होणार आहे.शाळेत शिक्षक उपलब्ध नसल्याने किंवा कमी संख्येने शिक्षक उपलब्ध झाले तर पालकांना आपल्या पाल्यांना परगावच्या शाळेत दाखल करणे, भाग पडेल. त्यातून प्रामुख्याने किशोरवयीन मुला-मुलींच्या शिक्षणाची परवड होईल व मुलींची सुरक्षितता धोक्यात येण्याची शक्यता आहे. सोबतच बाहेरगावी दररोज जाणे-येणे करण्यामुळे गळतीचे प्रमाण वाढेल.
जिल्हाधिकारी बोडके यांनी निवेदन घेऊन पुढील कार्यवाहीसाठी शासनाकडे पाठवण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

