वसंत भोईर,वाडा
नित्कृष्ट दर्जाच्या पाईपमुळे पाणीयोजना अडचणीत,
जलजीवन मिशन योजनेअंतर्गत विक्रमगड तालुक्यातील खांड गावाकरीता असलेल्या पाणी पुरवठा योजनेसाठी पुरवठादार कंपनीकडून पुरवण्यात आलेल्या एचडीपी पाईप अत्यंत नित्कृष्ट दर्जाचे निघाले आहेत.विशिष्ट दाबावर पाणीपुरवठा केल्यानंतर हे पाईप फुटत आहेत. त्यामुळे ही पाणीपुरवठा योजना अडचणीत सापडली आहे.या संदर्भात ठेकेदाराने संबंधित पुरवठादार कंपनी विरोधात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे.
विक्रमगड तालुक्यातील खांड ग्रामपंचायत अंतर्गत जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.या योजनेसाठी एचडीपीई पाईप पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने प्राधिकृत केलेल्या मे.सेठी अँड सन्स इंडस्ट्रीज या पुरवठादार कंपनीने पुरवठा केलेले पाईप हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे निघाले.विशिष्ट दाबाने पाणीपुरवठा सुरू केल्यानंतर हे पाईप फुटत आहेत.या संदर्भात ठेकेदार मनोज पवार यांनी जिल्हा परिषद प्रशासन व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या निदर्शनास आणून देत संबंधित पाईप बदलून मिळावेत,म्हणून मे.सेठी अँड सन्स इंडस्ट्रीज या पुरवठादार कंपनीला विनंती केली होती.त्यानुसार सुमारे १ हजार ५६६ मीटर पाईप कंपनीने बदलून दिले.मात्र उर्वरित पाईपही फुटू लागल्यामुळे तेही बदलून मिळावेत,म्हणून कंपनीला विनंती केली होती.त्यानंतर पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या उपस्थितीत पुरवठादार कंपनीच्या मालकांसोबत झालेल्या बैठकीनंतर सदर पाईप तातडीने बदलून द्यावेत,अशा सूचना पुरवठा कंपनीला प्रशासनाने केल्या होत्या.पण कंपनीने अद्याप पाईप बदलून दिले नाहीत.त्यामुळे वेळेत पाणी योजना सुरू करणे अवघड झाले आहे. यंदाही खांड गावातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.दरम्यान मे.सेठी अँड सन्स इंडस्ट्रीज,या पुरवठादार कंपनीने आता पाणीयोजनेसाठी अंथरलेला पाईप परत केल्याशिवाय नवीन पाईप बदलून दिला जाणार नाही,अशी आडमुठी भूमिका घेतल्याने ठेकेदार अडचणीत सापडला आहे.
खांडगावसह आणि जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कळंबोली बालीवली,विक्रमगड तालुक्यातील शीळ ( मोह बु.) या गावांच्या पाणीयोजनांचेही पाईप फुटू लागल्या संदर्भात अशाच तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंतांना पत्र लिहून प्रथमदर्शनी मे.सेठी अँड सन्स इंडस्ट्रीज या पुरवठादार कंपनीने मानांकनानुसार पाईप पुरवठा केला नसल्याचे दिसत असल्याचे नमूद केले आहे. तसेच पुरवठादार कंपनीकडून तातडीने संबंधित पाणी योजनांना पाईप बदलून मिळावे,म्हणून सूचना केल्या आहेत.मे.सेठी अँड सन्स इंडस्ट्रीज या पुरवठादार कंपनीने पुरवठा केलेला एचडीपीई पाईपच्या दर्जा संदर्भात दिवसेंदिवस तक्रारी वाढू लागल्याने संबंधित कंपनीच्या पाईपच्या गुणवत्तेबाबत शंका निर्माण होत आहे.या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

