वसंत भोईर,वाडा
चिंचेच्या झाडापासून भरघोस उत्पन्न,चिंचेची झाडे शेतकऱ्यांना ठरताहेत वरदान,
निरनिराळ्या हवामानात चांगले वाढणारे,अत्यंत हलक्या जमिनीत,माळरान व डोंगरउतारावर कुठेही चांगले वाढणारे चिंचेचे झाड हे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले आहे.चिंच हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे कोरडवाहू पीक असून दरवर्षी लाखोंचे उत्पन्न मिळवून देणारे म्हणून ओळखले जाते.चिंच वृक्ष हा मूळ आफ्रिकेतील असून अति प्राचीन काळापासून भारतीय भूमीत त्याचे उत्पादन घेण्यात येत आहे.जागतिक पातळीवर सर्वाधिक चिंचेची उत्पादन भारतात होते.चिंच या पिकाचे एकदा लावण्यात आलेले रोप अनेक वर्ष उत्पन्न देते.चिंचेला बहुगुणी पीक म्हणून ओळखले जाते.त्यामुळे शेतकरी जास्तीत जास्त चिंच लागवडीकडे वळत आहेत.
चिंचेचा उपयोग घरगुती वापरासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो.चिंच वाळवून बाराही महिने वापरली जाते. दुसऱ्या प्रकारची चिंच रक्तासारखी लाल असते.ही चिंच ऑक्टों.व नोव्हें. महिन्यामध्ये तयार होते.चिंच हे पीक विविध प्रकारच्या जमिनीत घेता येते.रेताल वाळू मिश्रित,कोरडे आणि डोंगर उतारावर देखील हे पीक घेता येते.
चिंचेचे दोन मुख्य प्रकार आहेत तर २४ उपजाती आहेत.चिंच पिवळसर किंवा चॉकलेटी रंगाची अथवा लालसर पिवळ्या रंगाचे असते.तर कलमी झाडापासून तयार करण्यात आलेले चिंचेचे झाड साधारणपणे सातव्या वर्षापासून उत्पन्न देते.विना खत- पाण्यातही भरघोस उत्पन्न व घनदाट सावली देणाऱ्या चिंचांच्या झाडाची लागवड शेतकऱ्यांना फायदेशीर ठरू शकते.
चिंच लागवडीनंतर सुरुवातीची दोन वर्ष पाणी व्यवस्थापन आवश्यक आहे. पावसाळ्यात पावसाचा खंड पडल्यास पंधरा दिवसांच्या अंतराने तर हिवाळ्यात गरजेनुसार पंधरा दिवस व उन्हाळ्यात आठ ते दहा दिवसाच्या अंतराने पाणी देणे गरजेचे असते.दर उन्हाळ्यामध्ये झाडांच्या आल्यामध्ये आच्छादन करावे. अन्यथा ठिबक सिंचन पद्धतीने पाणी द्यावे. बियांपासून रोपे तयार करून लागवड केलेल्या झाडांना लागवडीनंतर सुमारे दहा वर्षांनी फळे येण्यास सुरुवात होते.
चिंचेच्या झाडाला जून जुलै महिन्यात फुलोरा येतो आणि मार्च एप्रिल महिन्यात चिंचा काढणीस तयार होतात.चिंचा पिकण्यास सुरुवात झाल्यावर सालीला अथवा टरफलाचा हिरवा रंग बदलून तपकिरी रंग येतो.यावेळी पक्या फळांचे साल पूर्णपणे वाळून गरापासून वेगळी होते. चिंचेच्या दहा वर्षे वयाच्या एका झाडापासून बिया आणि टरफले वेगळी केली की,शंभर ते दीडशे कि.चिंच मिळते.तर झाडांचा विस्तार वाढल्यानंतर चिंचेच्या उत्पादनात दुपटीने अथवा तिपटीने वाढ होते.
तालुक्यातील अनेक गाव पाड्यांवर मोठमोठी चिंचेची झाड पाहायला मिळतात.या झाडांची गर्द सावली पडते म्हणून चिंचेचे म्हणून उन्हाळ्यात खेड्यातील ग्रामस्थाना आधार असतो.काही गावांमध्ये तर १०० वर्षाची झाडेही बघायला मिळतात.त्यामुळे चिंचेचे एक झाड सुमारे १० ते २० हजाराचे उत्पन्न मिळवून देत असल्याचे झाले येथील शेतकरी प्रदीप गोरे यांनी सांगितले.
ज्या भागात पाण्याची उपलब्धता नाही,त्या भागात चिंच वरदान ठरत आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजना आणि भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेच्या माध्यमातून चिंच लागवडीसाठी शासनाकडून अनुदान मिळत आहे.दोन हेक्टर क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ घेता येऊ शकतो.
– संजय घरत,तालुका कृषी अधिकारी

