सुशील भोईर,वसई
वसई येथे भीषण आगीत ३० ते ३५ झोपड्या भस्मसात :आग लागली की लावण्यात आली ?
वसई पश्चिमेस दत्तानी मॉलच्या मागच्या बाजूस असलेल्या झोपड्पट्टीला शनिवारी रात्री भीषण आग लागली.
रात्री आठ ते सव्वा आठच्या सुमारास ही घटना घडली.या दुर्देवी घटनेमध्ये ३० ते ३५ झोपड्या जळून खाक झाल्या आहेत.त्यामुळे अनेक गोरगरिबांचे संसार रस्त्यावर आले आहेत.
वसई पश्चिमेस दत्तानी मॉलच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेत मोलमजुरी करणारे बांधव झोपड्या बांधून राहत होते.शनिवारी रात्री अचानकपणे या झोपड्यांना आग लागली.
या आगीची माहिती वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाला मिळताच तामतलाव येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.मात्र आगीची तीव्रता लक्षात घेऊन अग्निशमन यंत्रणेने सनसिटी व नवघर अग्निशमन केंद्र येथूनही अग्निशमन दलाच्या गाड्या मागवल्या.तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले.या आगीत कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नसली तरी या आगीत ३० ते ३५ झोपड्या जळून खाक झाल्या आहेत.नेमकी आग कोणत्या कारणामुळे लागली याचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.तर दुसरीकडे ही आग लागली होती का ? की ती कोणीतरी लावली होती का ? यावर सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे.महानगरपालिका व पोलीस प्रशासनाने घटनेची कसून चौकशी करावी व आग कशी लागली हे लोकांसमोर आणावे,अशी मागणी करण्यात येत आहे.

